कमिशनवरून कचरा प्रकल्पाला विघ्न
By admin | Published: December 9, 2014 11:49 PM2014-12-09T23:49:24+5:302014-12-09T23:51:38+5:30
मुहूर्तावरच ठेच : प्राथमिक बैठकीत २ लाखांच्या खर्चावरून वाद
सांगली : महापालिका क्षेत्रातील कचऱ्यापासून इंधन निर्मितीच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला पहिल्याच घासाला खडा लागला आहे. यापूर्वी अनेक कंपन्यांनी कन्सल्टन्सीच्या नावाखाली महापालिकेचे कोट्यवधी रुपये लुटल्यामुळे काही सदस्यांनी प्रकल्प सादरीकरणाच्या बैठकीतच कमिशनचा विषय उपस्थित केला. त्यामुळे निर्माण झालेल्या वादात ही बैठक गुंडाळण्यात आली. तरीही प्रशासनाला अजूनही या प्रकल्पाबद्दल आशा आहे.
सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रातील कचऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. या प्रश्नावर तोडगा काढण्याच्या दृष्टीने कचऱ्यापासून इंधन निर्मितीचा प्रकल्प पुढे आला. टाटा कन्सल्टन्सीने यासाठी पुढाकार घेतला. या कंपनीसह या प्रकल्पासाठी इच्छुक असणाऱ्या ‘दाराशॉ’ या कंपनीच्या काही प्रतिनिधींसोबत महापालिका पदाधिकारी, अधिकारी यांची बैठक आज, मंगळवारी महापालिकेत आयोजित करण्यात आली होती. स्थायी समितीच्या सभागृहात कंपनी प्रतिनिधींनी या प्रकल्पाबाबतची माहिती दिली. पदाधिकारी व सदस्यांनी कंपनी प्रतिनिधींशी चर्चा केली. प्रकल्पाच्या अनुषंगाने काही शंकाही उपस्थित झाल्या. सत्ताधारी काँग्रेसचे नगरसेवक सुरेश आवटी यांनी कंपनीला द्याव्या लागणाऱ्या कमिशनबाबतचा प्रश्न उपस्थित केला.
आवटी म्हणाले की, आजवर अनेक कंपन्यांनी महापालिकेला चुना लावला आहे. यामध्ये पाच ते साडेपाच कोटी रुपये केवळ कमिशनपोटी महापालिकेला द्यावे लागले. प्रत्यक्षात यातील एकही प्रकल्प अस्तित्वात आला नाही. त्यामुळे कंपनीला कमिशन देताना प्रकल्पपूर्तीची हमी घेणार का, असा सवाल उपस्थित केला. आयुक्त अजिज कारचे यांनी सांगितले की, कंपनीला प्रकल्प अहवालासाठीच सुरुवातीला पाच लाख रुपये देण्यात येतील. मात्र, कमिशनपोटी द्यावी लागणारी रक्कम शासन अनुदान ज्या पद्धतीने प्राप्त होईल त्या पद्धतीनेच देण्यात येईल. महापालिकेवर याबाबत कोणताही बोजा पडणार नाही. त्यामुळे सदस्यांनी फी व कमिशनबाबतची शंका मनातून काढून टाकावी, असे आवाहन केले. यावर नगरसेवक शेखर माने म्हणाले की, असे असेल तर सादरीकरणाच्या बैठकीवेळीच पुढील स्थायी समिती बैठकीसमोर या प्रकल्पाअंतर्गत २ लाख रुपये खर्चाचा प्रस्ताव कसा आला? याबाबत आयुक्तांनी स्पष्टीकरण करण्याचा प्रयत्न करताच आवटी व अन्य नगरसेवकांनी, अशा पद्धतीने खर्च वाढत जाऊन प्रकल्पाऐवजी कमिशनपोटीच लाखो रुपये वाया जातील, असे मत व्यक्त केले. त्यानंतर आयुक्तांनी हा प्रस्ताव मी मागे घेत आहे, असे सांगत बैठक संपविली. या बैठकीस महापौर कांचन कांबळे, उपमहापौर प्रशांत पाटील-मजलेकर, गटनेते किशोर जामदार, स्थायी सभापती संजय मेंढे, विरोधी पक्षनेते दिग्विजय सूर्यवंशी, उपायुक्त ओमप्रकाश दिवटे, टीना गवळी व अन्य नगरसेवक उपस्थित होते. (प्रतिनिधी)
आयुक्त नाराज
बैठकीत स्पष्टीकरणानंतरही शंका उपस्थित झाल्याने आयुक्तांनी बैठक आटोपती घेतली. सदस्यांनी प्रकल्प व्हावा, अशीच भावना व्यक्त केली होती, मात्र शंका वाढल्यामुळे आयुक्तांनी नाराजीतच बैठक संपविली.