School closed : शिक्षणाचा पाया मजबूत होणार तरी कसा ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2022 01:54 PM2022-01-11T13:54:15+5:302022-01-11T13:55:10+5:30
ऑनलाइन शिक्षणाबद्दलही पालकांमध्ये नाराजीचा सूर आहे.
अविनाश कोळी
सांगली : गेली दीड वर्षे शिक्षणाची रुळावरून घसरलेली गाडी गेल्या सहा महिन्यात पुन्हा रुळावर आली असताना पुन्हा शाळा बंद झाल्या आहेत. त्यामुळे पालक, शिक्षकांमधून मुलांच्या शैक्षणिक नुकसानीची चिंता व्यक्त केली जात आहे. ऑनलाइन शिक्षणाबद्दलही पालकांमध्ये नाराजीचा सूर आहे. मुलांचा प्राथमिक शिक्षणाचा पाया कमकुवत होण्याची भीती पालक व शिक्षकांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.
प्राथमिक शिक्षणाचा पाया मजबूत असावा लागतो. याच काळात मुलांच्या शाळा बंद होत आहेत. सहा महिन्यांपासून शिक्षणाची घडी बसली होती. आता ती पुन्हा विस्कळीत झाल्याने मोठे शैक्षणिक नुकसान होणार आहे. - राजाराम व्हनखंडे, मुख्याध्यापक, म. के. आठवले विनय मंदिर, सांगली
ऑनलाइन शिक्षणाने फारसे काही साध्य होणार नाही. शाळांमध्येच योग्य व शिस्तबद्ध शिक्षण होत होते. सहा महिन्यातच पुन्हा शाळा बंद झाल्याने मुलांचे नुकसान होणार आहे. त्यामुळे काळजी वाटते.- अश्विनी गायकवाड, पालक
माझा मुलगा सहावीला आहे. शिक्षणाची गोडी लागेपर्यंत शाळांचे दरवाजे बंद झाल्याने आमची चिंता वाढली आहे. दोन वर्षांचे हे नुकसान कधीही भरुन न निघणारे आहे. ऑनलाइन शिक्षण हा पर्याय होऊच शकत नाही. - इरफान मुल्ला, पालक
पहिलीतून मुलगा ऑनलाइन शिक्षण घेत दुसरीला गेला. हा महत्त्वाचा पाया शाळांविना कधीच मजबूत होऊ शकत नाही. त्यामुळे पालक म्हणून आम्हाला या गोष्टीची सर्वाधिक काळजी वाटत आहे.- दिनकर हिरकुडे, पालक
मुलांवरील शैक्षणिक संस्कार ज्या वयात होत असतात त्याच काळात शाळा बंद रहात आहेत. ऑनलाइन शिक्षणाचा फारसा उपयोग होत नाही. एका तासात मुले काय व कशी शिकणार आहेत?- नितीन चौगुले, पालक