गाळमिश्रित पाणी घरांमध्ये घुसले
By admin | Published: January 13, 2015 11:39 PM2015-01-13T23:39:10+5:302015-01-14T00:30:01+5:30
इस्लामपुरात प्रकार : महिलांचा संताप
इस्लामपूर : शहरातील महादेवनगर परिसरात असणाऱ्या नगरपालिकेच्या जलशुध्दीकरण केंद्रातील पिण्याच्या पाण्याच्या टाकीतील गाळमिश्रित पाणी रस्त्याच्या पश्चिम बाजूला असणाऱ्या मोकळ्या जागेत व घरांमधून शिरल्याने येथील नागरिक संतप्त झाले होते. या परिसरातील गटारी मोठ्या कराव्यात, या सहा वर्षांपासूनच्या मागणीकडे सत्ताधाऱ्यांनी दुर्लक्ष केले आहे.
आज मंगळवारचा मुहूर्त साधून पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने टाकी स्वच्छ करण्यासाठीची मोहीम हाती घेतली. दुपारी साडेबारा वाजता टाकीतील गाळमिश्रित पाणी सोडण्यास सुरुवात झाली. या परिसरात गटारींची व्यवस्था अत्यंत अरुंद पध्दतीची असल्याने हे गाळमिश्रित पाणी धो—धो उसळून बघता-बघता पश्चिम बाजूच्या मोकळ्या जागेत आणि सुमारे १५ ते २० घरांत शिरले. या पाण्याचा लोंढा इतका जोरात होता की, सखल भागातील घरांमधून एक फूट उंच हे गाळमिश्रित पाणी भरून राहिले.
या अचानकपणे घडलेल्या प्रकाराने घरातील महिलांची भंबेरी उडाली. घरातील साहित्य, वस्तू गाळात बुडाल्या. पहिल्या खोलीपासून स्वयंपाक खोलीपर्यंत हा गाळ पसरल्याने घरातून दुर्गंधी सुटली होती. सायंकाळी पाचपर्यंत हे पाणी गटारींतून वाहत होते.
या घटनेची माहिती समजताच पालिकेतील ज्येष्ठ सदस्य बी. ए. पाटील, मुख्याधिकारी नीलेश देशमुख यांनी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. देशमुख यांनी पालिकेच्या स्वच्छता विभागाला बोलावून, परिसरातील स्वच्छता करण्याचे काम सुरु केले. तुंबलेल्या गटारी मोकळ्या करुन पाणी वाहते करण्यात आले. तसेच मोकळ्या जागेत पसरलेला गाळही गटारीत सोडण्यात आला. अखेर दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास परिसरातील स्वच्छता पूर्ण झाली.
या प्रकाराबद्दल परिसरातील नागरिक, महिला संताप व्यक्त करीत होत्या. गेल्या सहा—सात वर्षांपासून येथील गटारी मोठ्या करण्याची मागणी केली आहे. मात्र सत्ताधाऱ्यांनी त्याकडे लक्ष दिलेले नाही. हे गाळमिश्रित पाणी रस्त्यावरुन वाहत पुन्हा पश्चिम बाजूच्या गटारीत येते. त्यामुळे येथील रस्ताही नेहमी खड्ड्यांनी व्यापलेला असतो. पालिकेने गटारींची चांगली व्यवस्था न करुन दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे. (वार्ताहर)