ताकारी पंपगृह वितरीकेच्या पाण्याचे पूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:21 PM2021-03-09T16:21:32+5:302021-03-09T16:24:19+5:30
सांगली : शाश्वत शेती करण्यासाठी पाण्याचीही शाश्वती असणे आवश्यक आहे. शेतकऱ्याला पाण्याचा कायमस्वरूपी स्त्रोत निर्माण झाल्यानंतर शेती उत्पादनाच्या माध्यमातून ...
सांगली : शाश्वत शेती करण्यासाठी पाण्याचीही शाश्वती असणे आवश्यक आहे. शेतकऱ्याला पाण्याचा कायमस्वरूपी स्त्रोत निर्माण झाल्यानंतर शेती उत्पादनाच्या माध्यमातून शेतकऱ्याचे जीवनमान उंचावेल. शाश्वत पाण्यासाठी जिल्ह्यातील उपसा सिंचन योजना प्राधान्याने पूर्ण करू. शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पाणी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील राहीन, अशी ग्वाही कृषि राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी दिली.
कडेगाव तालुक्यातील देवराष्ट्रे येथे ताकारी पंपगृह विभाग क्रमांक 1 च्या वितरीका क्रमांक 2 चे पाणी परिचलन व पाणी पूजन कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार मोहनराव कदम, आमदार विक्रम सावंत, प्रांताधिकारी गणेश मरकड, ताकारी पंपगृह क्र. 1 चे कार्यकारी अभियंता राजन डवरी, तहसिलदार शैलजा पाटील, जलसंपदा विभागाचे उपविभागीय अधिकारी सचिन नाईक, महेंद्र लाड, डॉ. जितेश कदम, बाळासाहेब पवार, सुरेश खारगे, खाशाबा दळवी, रतन पाटील, उत्तमराव पवार, उमेश साळोखे, एन. बी. कांबळे, पी. एम. येसणे आदि उपस्थित होते.
कृषि राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम म्हणाले, जिल्ह्यात ताकारी, टेंभू, आरफळ, म्हैसाळ या उपसा जलसिंचन योजना दुष्काळी भागासाठी वरदायिनी ठरत आहेत. या योजनांमुळे दुष्काळी भागांचा कायापालट होताना दिसत असून उर्वरीत दुष्काळी भागात पाण्याचा स्त्रोत उपलब्ध करून देण्यासाठी या योजना पूर्ण करण्यावर भर देण्यात येत आहे. सांगली जिल्ह्याला पालकमंत्री म्हणूल लाभलेले जयंत पाटील यांच्याकडे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास हा विभाग असल्याने येत्या काळात जिल्ह्यातील उपसा जलसिंचन योजनांची उर्वरीत कामे गतीने पूर्ण करण्यात येतील.
राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम म्हणाले, अतिवृष्टी नंतर आलेल्या कोरोना संकटातून आता महाराष्ट्र हळूहळू बाहेर पडत आहे. कोरोना संकटामुळे राज्याच्या तिजोरीत 1 लाख 13 हजार कोटीची तूट आली आहे. पण राज्यातील कृषि उत्पन्नामध्ये 11.50 टक्क्यांची वाढ झाली आहे. ही एक आशेची बाब आहे. या पुढील काळात जिल्ह्यातील सर्वच प्रकल्प मार्गी लावण्यासाठी शासन स्तरावरून अधिकाधिक निधी आणण्यासाठी प्रयत्नशील राहू. त्याचबरोबर नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांसाठी 50 हजार रूपये अनुदान देण्याबाबत शासन स्तरावरील पुरवणी मागण्यांमध्ये याबाबतचा पाठपुरावा करण्यात येईल, असे ते म्हणाले.
कार्यकारी अभियंता राजन डवरी यावेळी म्हणाले, ताकारी पंपगृह क्रमांक 1 ची वितरीका क्रमांक 2 ही सुमारे 10 कि.मी. लांबीची पाणी परिचलन वितरीका आहे. यासाठी 9 कोटी 50 लाख इतका खर्च झाला आहे. या वितरीकेवर 24 पाणी व्हॉल्व बसविण्यात आले असून याव्दारे 2 हजार 400 हेक्टर क्षेत्राला पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. या वितरीकेव्दारे देवराष्ट्रे गावातील 31.20 हेक्टर, कुंभारगाव 330.47 हेक्टर, जाधवनगर 102.40 हेक्टर, बलवडी 703.19 हेक्टर, कुंडल 571.12 हेक्टर, आंधळी 342.24 हेक्टर, पलूस 320.91 हेक्टर या प्रमाणे शेतीस पाणीपुरवठा होणार आहे.
राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांच्याहस्ते वितरीका क्रमांक 2 चा व्हॉल्व फिरवून पाणी वितरण शुभारंभ करण्यात आला. कुंभारगाव येथील पहिल्या व्हॉल्वच्या ठिकाणी त्यांच्याहस्ते या वितरीकेच्या पाण्याचे पूजन करण्यात आले.