जत तालुक्यातील ४२ गावांचे पेढे वाटप
By admin | Published: July 9, 2015 11:35 PM2015-07-09T23:35:37+5:302015-07-09T23:35:37+5:30
आंदोलन स्थगित : राज्य शासनाकडून मागण्या मान्य; सांगलीत जल्लोष
सांगली : येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारपासून सुरू असलेल्या जत तालुक्यातील ४२ गावांच्या शेतकऱ्यांचे आंदोलन गुरुवारी सकाळी स्थगित करण्यात आले. मागण्या मान्य झाल्याने शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जल्लोष केला. पेढे वाटून व गुलालाची उधळून करून आनंद व्यक्त करण्यात आला.
जत पूर्व भागातील उमदीसह ४२ गावांचा म्हैसाळ उपसा सिंचन योजनेत समावेश करून शेतीला पाणी द्यावे, अन्यथा सरकारने कर्नाटकात जाण्याचे नाहरकत पत्र द्यावे, या मागणीसाठी हे ठिय्या आंदोलन सोमवारपासून येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू होते. पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष सुनील पोतदार, उपाध्यक्ष अनिल शिंदे, दावल शेख आदींच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू होते. मुंबईमध्ये बुधवारी सायंकाळी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यामध्ये या गावांचा शेतीचा पाणीप्रश्न मिटविण्यासाठी ३२ कोटी रुपये देण्याचे मान्य करण्यात आले. तसे लेखी पत्रही आंदोलनकर्त्यांना देण्यात आले. त्यानंतर सांगलीत सुरू असलेले आंदोलन स्थगित करण्यात आले. यावेळी संजय तेली, मल्लिकार्जुन सुरगोंड, बसाप्पा कोल्याळ, हरीष शेटे, राजू चव्हाण, मल्लाप्पा सालुटगी, सुनील पवार, लघु पाटबंधारे विभागाचे अधिकारी सचिन पवार, एस. आर. घोलप आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
आभारपत्रही सादर...
गुरुवारी सकाळी मुंबईत गेलेले कार्यकर्ते सांगलीत आंदोलनस्थळी आले. त्यांनी आंदोलनकर्त्यांना शासनाचे पत्र दाखविले. याचवेळी शासनाचे आभार मानणारे पत्र आंदोलनकर्त्यांकडून जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांना देण्यात आले. यानंतर एकच जल्लोष करण्यात आला.