सांगली जिल्ह्यातील दुधाचे ९० टक्के वितरण ठप्प, भाजीपाल्याची आवक घटली
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2019 02:35 PM2019-08-06T14:35:21+5:302019-08-06T14:35:49+5:30
सांगलीच्या दक्षिण व पश्चिम भागातील प्रमुख मार्ग महापुराने बंद झाल्याने मंगळवारी दूधसंकलनावर मोठा परिणाम झाला. एकूण दूध वितरणापैकी ९0 टक्के दूध वितरण होऊ शकले नाही.
सांगली - सांगलीच्या दक्षिण व पश्चिम भागातील प्रमुख मार्ग महापुराने बंद झाल्याने मंगळवारी दूधसंकलनावर मोठा परिणाम झाला. एकूण दूध वितरणापैकी ९0 टक्के दूध वितरण होऊ शकले नाही. महापूर असेपर्यंत दूधसंकलनाची स्थिती अशीच राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे दुधाची मोठी टंचाई जिल्ह्यात जाणवणार आहे.
सांगली जिल्ह्यात प्रतिदिन ५ लाख ९ हजार लिटर दूधसंकलन होत असते. यातील ४ लाख १२ हजार लिटर दूध हे खासगी डेअºयांमार्फत तर ९७ हजार ५00 लिटर दूध सहकारी डेअºयांमार्फत येत असते. बहुतांश खासगी डेअºया या सांगलीच्या दक्षिण, पश्चिम भागातील आहेत. याच मार्गावर जलकोंडी झाल्याने मंगळवारी ९0 टक्के दूध संकलन घटले. पुणे, मुंबईकडे जिल्ह्यातून जाणाºया दुधाचे वितरणही अडचणीत आले आहे. अनेक प्रमुख मार्ग बंद असल्याने उत्पादीत व प्रक्रिया केलेल्या दुधाची वाहतूक कशी करायची, असा प्रश्न निर्माण झाला आहे. दूध न आल्याने विक्रेत्यांनाही मंगळवारी पळापळ करावी लागली. छोट्या, मोठ्या दुकानांमधील दूधही आता संपुष्टात आले आहे. त्यामुळे येत्या दोन-तीन दिवसात दुधाची टंचाई तीव्र होण्याची शक्यता आहे.
वारणा, चितळे, स्वाभिमानी, अमुल, स्फुर्ती अशा डेअ-यांकडील येणा-या दुधाच्या वाहतुकीसमोर अडचणीत आहेत. त्याचबरोबर शहरातील स्थानिक दूध डेअ-याही सध्या पाण्यात आहेत. सांगलीच्या गवळी गल्ली, गावभाग परिसरात आता पुराचे पाणी शिरल्याने त्याठिकाणाहून येणारा स्थानिक दूधपुरवठाही ठप्प झाला आहे. त्यामुळे नागरिकांच्या अडचणीत आता दुधाच्या अडचणीची भर पडली आहे.
दुधाबरोबरच स्थानिक बाजारात भाजीपाल्याची आवकही घटली आहे. कर्नाटकसह जयसिंगपूर, शिरोळ, तुंग यासह मिरजेच्या पश्चिम भागातील गावातून येणारा भाजीपाला बंद झाला आहे. केवळ मिरज पूर्व भागातूनही भाजीपाल्याची आवक सुरू आहे. मागणीच्या तुलनेत हा पुरवठा अत्यंत कमी असल्याने भाजीपाल्याचे दर वाढले आहेत. येत्या काही दिवसात आणखी दरवाढ होऊन भाजीपाल्याच्या महागाईचा त्रासही नागरिकांना होऊ शकतो.
एरवी ३० ते ४० रुपये किलो असणारी भाजी चक्क ८० ते १०० रुपये अशा दुप्पट दराने विकली जात आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे खर्चाचे बजेट कोलमडले आहे. एक महिना पावसाची संततधार सुरू असून, काही भाज्यांची वाढ मंदावली आहे. त्यामुळे बाजारात भाज्यांची आवकही कमी झाली आहे. नाईलाजाने चढ्या दराने भाजी खरेदी करावी लागत आहे.