सॅटेलाईट इमेजद्वारे होेणार शेतीकर्जाचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:24 AM2021-03-06T04:24:37+5:302021-03-06T04:24:37+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : शेती क्षेत्रात अभिनव पाऊल टाकत सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेमार्फत सॅटेलाईट इमेजद्वारे पीक कर्जवाटप, शेतकऱ्यांना ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : शेती क्षेत्रात अभिनव पाऊल टाकत सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेमार्फत सॅटेलाईट इमेजद्वारे पीक कर्जवाटप, शेतकऱ्यांना हवामानाची माहिती देणे, त्यांचे पंचनामे करणे अशा गोष्टी केल्या जाणार आहेत. सांगली जिल्हा बँकेने यासाठी स्कायमेट कंपनीशी करार केला असून, हा प्रकल्प राबविणारी राज्यातील पहिली बँक ठरली आहे.
सांगली जिल्हा बँकेने सोसायटी संगणकीकरण व जिल्हा बँकेशी त्यांच्या संलग्नतेतही राज्यातील पहिला प्रकल्प राबविला आहे. आता त्यापुढे आणखी एक पाऊल टाकत सॅटेलाईटद्वारे पीक पाहणी व कर्जवाटपाचा प्रकल्प हाती घेतला आहे. यापूर्वी एखाद्या शेतकऱ्याने कर्ज प्रस्ताव दिल्यानंतर त्यांची जमीन पाहणी करण्यासाठी बँक कर्मचाऱ्याला प्रत्यक्ष बांधावर जावे लागत होते. बऱ्याचदा काही लोकांकडून कर्मचाऱ्यांची जागेच्या क्षेत्रफळ व मालकीबाबत दिशाभूलही केली जात होती. याशिवाय पिकाची योग्य माहिती संकलित करतानाही अडचणी येत होत्या.
स्कायमेट व जिल्हा बँकेत झालेल्या करारानुसार आता केवळ जमिनीच्या सात-बारा क्रमांकावरून जमिनीची इत्यंभूत माहिती मिळणार आहे. याशिवाय संबंधित जमिनीत कोणते पीक घेतले आहे, त्या पिकाचे वय किती आहे, वाढ कशी झाली आहे, याची माहिती सॅटेलाईटद्वारे कळणार आहे. त्यामुळे कर्जवाटप व अनुषंगिक सर्व गोष्टी जलदगतीने होतील.
याशिवाय शेतकऱ्यांना हवामानातील संभाव्य बदल, संकटाचे संकेत काही दिवसांपूर्वीच मिळतील. शेतकऱ्यांना याबाबत सतर्क केले जाणार आहे. बँकिंग क्षेत्रातील हे क्रांतिकारी पाऊल ठरले आहे.
चाैकट
एप्रिलपासून होणार सुरुवात
जिल्हा बँकेच्या या प्रकल्पाची सुरुवात ३० एप्रिलपासून होणार आहे. राज्य शासनाने अन्य उपक्रमांसाठी स्कायमेट कंपनीशी करार केल्यानंतर जिल्हा बँकेने बँकिंग व कृषी क्षेत्रासाठी अनोखा करार केला. त्याची तातडीने अंमलबजावणीही करणार आहे.
कोट
सांगली जिल्हा बँकेने गेल्या पाच वर्षांत अनेक अभिनव उपक्रम राबविले. सॅटेलाईटद्वारे पीक पाहणी, कर्जवाटप, शेतकऱ्यांना माहिती देणे या गोष्टींचा हा प्रकल्प राज्याच्या बँकिंग व कृषी क्षेत्रात क्रांती घडविणारा आहे. याचा आम्हाला अभिमान आहे. शेतकऱ्यांना याचा मोठा लाभ मिळेल.
- दिलीपतात्या पाटील, अध्यक्ष, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक