पूरग्रस्त भागातील पशुधनासाठी पशुखाद्य व चारा वितरीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2019 02:10 PM2019-08-19T14:10:29+5:302019-08-19T14:10:40+5:30
सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्त भागातील पशुधनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्राप्त होणारे पशुखाद्य व चारा पूरबाधित तालुक्यातील पशुपालकांना वितरीत करण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.
सांगली : सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्त भागातील पशुधनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्राप्त होणारे पशुखाद्य व चारा पूरबाधित तालुक्यातील पशुपालकांना वितरीत करण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.
वारणा सहकारी दूध उत्पादक संघाकडून हायग्रेन प्यालेट ५० नग, महाड मॅन्यूफॅक्चर असोसीएशनकडून ५० किलोच्या २०० पशुखाद्य पिशव्या, सुमित ट्रेडर्स मुंबई जनरल मॅनेजर, देवनार गोवंडी यांच्याकडून 360 ब्लिचिंग पावडर पिशव्या, उत्तम कोळेकर भिवंडी मंबई यांच्याकडून ६० ब्लिचिंग पावडर पिशव्या, पशुधन विकास विभाग रत्नागिरी विभाग रत्नागिरी यांच्याकडून प्राप्त पशुखाद्य, बारामती ॲग्रो लिमिटेड यांच्याकडून १० टन पशुखाद्य, पालघर एमएमए संस्था महाड यांच्याकडून ६१० पोती मीठ, व्यवस्थापक आयआरबी रायगड यांच्याकडून ५ टन हिरवा चारा पूरग्रस्त भागात वितरीत करण्यात आले आहे.
मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयाकडून २५० पिशव्या पशुखाद्य, जिल्हा प्रशासन रायगड व पशुधन विकास अधिकारी माणगाव कर्मचारी संघटना यांच्याकडून ३ टन ओला चारा, ७ टन सुखा चारा, कडबा कुट्टी २५ किलो, भाताचा कोंडा २५ किलो आणि नेचर डेअरी कळस इंदापूर यांच्याकडून ८ हजार ३७० किलो ऊस व जयहिंद गोळी पेंड १०० पिशव्या, रायगड जिल्ह्यातून ६ टन चारा प्राप्त झाला आहे. पशुधनासाठी प्राप्त चारा व खाद्य पूरग्रस्त भागात वितरीत करण्यात आले आहे.
पूरग्रस्त बाधित कुटुंबांना 13 कोटी 92 लाखाचे सानुग्रह वाटप
सांगली जिल्ह्यात पुरामूळे बाधित झालेल्या कुटूंबांना रूपये ५ हजार प्रमाणे सानुग्रह अनुदान वितरीत करण्यात येत आहे. दिनांक १७ ऑगस्ट अखेर ग्रामीण भागातील १९ हजार १३९ आणि शहरी भागातील ८ हजार ७०१ कुटूंबांना १३ कोटी ९२ लाखाचे सानुग्रह अनुदान पूरग्रस्त कुटूंबांना वितरीत करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.
पूरग्रस्त कुटुंबांना ग्रामीण भागात १० हजार आणि शहरी भागात १५ हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्यात येत आहे. त्यापैकी ५ हजार रुपयांचा रोख वाटप करण्यात येत आहे. उर्वरित कुटुंबांनाही अनुदान वाटप सुरु आहे.
जिल्ह्यात पुरामुळे बाधित झालेल्या कुटुंबांना २०० टीममार्फत सानुग्रह अनुदानाचे वितरण करण्यात येत आहे. सानुग्रह वितरणाच्या मदतीसाठी सोलापूर जिल्ह्यातून महसूलचे ५२ कर्मचारी उपलब्ध झाले असून यामध्ये ४७ तलाठी आणि ५ सर्कल कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. अधिकचे मनुष्यबळ उपलब्ध झाल्याने सानुग्रह अनुदान वितरण करण्यास मदत होणार आहे, असे अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम यांनी सांगितले.
मिरज तालुक्यातील पूरबाधितांना वाटपासाठी ११४० किट रवाना
पूरग्रस्तांना अनेक सेवाभावी, स्वयंसेवी संस्था, दानशूर व्यक्ती यांच्याकडून प्राप्त होणारी मदतीचे जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथे किट तयार केले जात आहे. आम्ही पंचवटीकर साई निर्माण संस्था महाड आणि जितो (जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायजेशन) यांच्याकडून प्राप्त झालेल्या मदतीतून जीवनावश्यक वस्तूचे तयार केलेले ११४० किट मिरज तालुक्यातील पूरबाधित कुटूंबांना वाटप करण्यासाठी रवाना झाले.