‘क्रांती’कडून टिश्यू कल्चर रोपांचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 05:07 AM2021-01-13T05:07:18+5:302021-01-13T05:07:18+5:30
ऊस लागवडीमध्ये शुध्द, निरोगी व त्रिस्तरीय बेणे मळ्यातील प्रमाणित बियाणे वापरल्यास उत्पादनात एकरी ५ ते ६ टनांची वाढ होते. ...
ऊस लागवडीमध्ये शुध्द, निरोगी व त्रिस्तरीय बेणे मळ्यातील प्रमाणित बियाणे वापरल्यास उत्पादनात एकरी ५ ते ६ टनांची वाढ होते. कारखाना कार्यक्षेत्रात सुमारे ४ हजार हेक्टर क्षेत्रावर दरवर्षी नवीन लागण केली जाते. सर्वसाधारणपणे लागणीसाठी शेतकरी आपल्याकडे उपलब्ध असणारे बियाणे वापरतात. एकच बियाणे पुन्हा-पुन्हा वापरल्यामुळे ऊस जातीची उत्पादन क्षमता कमी होते, रोगकिडीचा प्रादुर्भाव वाढतो. त्यामुळे उत्पादनात घट येते. ऊस लागणीसाठी शुध्द बियाणे मिळावे म्हणून कारखान्यामार्फत मागील ५ वर्षांपासून वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे येथून टिश्यूकल्चर ऊसरोपे आणली जातात. या रोपांचा दर ७ रुपये प्रतीरोप असा आहे. कारखान्यामार्फत ४ रुपये प्रती रोप अनुदान दिले जाते. ही रोपे शेतकऱ्यांना पुरवठा केली जातात. या योजनेतून दरवर्षी शुध्द बियाणे पुरवठा केल्यामुळे कार्यक्षेत्रात बियाणे बदल करण्याच्या तंत्राला गती मिळाली असून, मागील हंगामात सुमारे ११०० हेक्टर क्षेत्रावर बियाणे बदल झाला आहे.
तसेच नवीन लागण करताना ऊस उत्पादक शेतकरी चौकस बनल्यामुळे बियाणे खरेदी करताना, बेणे प्लॉटमधील बियाणे कोठून आणले व ते कोणत्या प्रतीचे आहे. याची चौकशी करू लागले आहेत. यावर्षी लांबलेला पाऊस व आक्टोबरपर्यंत झालेल्या लागणी एकशेवडी झाल्यामुळे कारखान्याच्या योजनेतून पुरवठा केलेल्या बियाणे प्लॉटचा पुढीलवर्षी बियाणे म्हणून उपयोग करण्यास शेतकऱ्यांना मदत होणार आहे.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य शरद लाड, जे. पी. लाड, कार्यकारी संचालक चंद्रकांत गव्हाणे, सचिव आप्पासाहेब कोरे, संचालक नारायण पाटील, जनसंपर्क अधिकारी वसंत लाड, वित्त अधिकारी शामराव जाधव, जे. पी. लाड, सुभाष मोहिते, अधिक लाड, संदीप पवार, पांडुरंग चव्हाण, ऊस विकास विभागाचे ऍग्री ओव्हरसियर व कर्मचारी, शेतकरी उपस्थित होते.