जिल्ह्यात पुन्हा कोरोनाबाधित वाढले; ३६ नवे रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:28 AM2021-03-10T04:28:22+5:302021-03-10T04:28:22+5:30
सांगली : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत मंगळवारी पुन्हा वाढ झाली. सोमवारी २० बाधित आढळले होते, तर मंगळवारी ३६ जणांना कोराेनाचे ...
सांगली : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत मंगळवारी पुन्हा वाढ झाली. सोमवारी २० बाधित आढळले होते, तर मंगळवारी ३६ जणांना कोराेनाचे निदान झाले आहे. महापालिका क्षेत्रासह आटपाडी, वाळवा तालुक्यात सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहेत. १९ जण कोरोनामुक्त झाले आहेत.
गेल्या नऊ दिवसांपासून जिल्ह्यातील रुग्णसंख्या वाढतच आहे. त्यामुळे काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सांगली, मिरजेत प्रत्येकी सात तर आटपाडी तालुक्यात नऊ रुग्ण आढळले आहेत.
आरोग्य विभागाने आरटीपीसीआर अंतर्गत २५८ जणांच्या नमुन्यांची चाचणी घेतली त्यात १८ जण पॉझिटिव्ह आढळले आहेत, तर रॅपिड ॲंटिजेनच्या ६२८ चाचण्यांमधून २० जणांना कोरोनाचे निदान झाले आहे.
उपचार घेणाऱ्या रुग्णसंख्येतही वाढ झाली असून, सध्या २८७ जण उपचार घेत आहेत. त्यातील ४३ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. ३९ जण ऑक्सिजनवर, तर चारजण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येकी एकास कोरोनाचे निदान झाले आहे.