जिल्हा बँक निवडणूकपूर्व प्रक्रियेस सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2020 04:48 PM2020-01-03T16:48:29+5:302020-01-03T17:03:23+5:30
सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणूकपूर्व प्रक्रिया सुरू झाली आहे. याअंतर्गत प्रारूप मतदार यादीसाठी बॅँकेच्या सभासद संस्थांकडून ठराव मागविण्यात आले आहेत. ३१ जानेवारी २०२० पर्यंत संस्थांनी त्यांचे ठराव दोन प्रतींमध्ये तालुका उपनिबंधकांकडे द्यायचे असून, त्यानंतर मतदार याद्या अंतिम करण्याची प्रक्रिया सुरू होईल.
सांगली : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणूकपूर्व प्रक्रिया सुरू झाली आहे. याअंतर्गत प्रारूप मतदार यादीसाठी बॅँकेच्या सभासद संस्थांकडून ठराव मागविण्यात आले आहेत. ३१ जानेवारी २०२० पर्यंत संस्थांनी त्यांचे ठराव दोन प्रतींमध्ये तालुका उपनिबंधकांकडे द्यायचे असून, त्यानंतर मतदार याद्या अंतिम करण्याची प्रक्रिया सुरू होईल.
एप्रिल किंवा मेमध्ये संचालक मंडळाची २०२० ते २०२५ या कालावधीसाठी निवडणूक होणार आहे. निवडणुकीचा कार्यक्रम मार्च महिन्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी सहकार विभागाकडून निवडणूक प्रक्रियेस सुरुवात झाली आहे. नवीन वर्षात जिल्ह्यातील काही मोठ्या सहकारी संस्थांच्या पंचवार्षिक निवडणुका होणार आहेत. यात जिल्हा बॅँकेसह सांगली अर्बन बँक, कृषी उत्पन्न बाजार समिती, शिक्षक बॅँक, सॅलरी अर्नर्स सोसायटी यांचा समावेश आहे. त्यामुळे हे वर्ष जिल्ह्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकांनी गाजणार आहे.
यातील जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी मतदार यादीची प्रक्रिया सुरु झाली आहे. जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा विभागीय सहनिबंधक श्रीकृष्ण वाडेकर यांनी जिल्हा बॅँकेच्या २०२० ते २०२५ या कालावधीसाठी होणाऱ्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी सभासद संस्थांना ठराव सादर करण्याचे आदेश दिले आहेत. जानेवारीअखेर यासाठी मुदत दिली आहे.
त्यानंतर तालुका उपनिबंधकांकडून हे ठराव जिल्हा उपनिबंधकांकडे सादर होतील. त्यांच्याकडून ते बॅँकेला दिले जाणार असून बॅँक या ठरावांची छाननी करून यातील पात्र, अपात्र सभासद, मतदार निश्चित करणार आहे. त्यांची प्रारूप मतदार यादी जाहीर होईल. त्यावर हरकती, सूचना मागविण्यात येतील. त्यावर सुनावणी होऊन बॅँकेची अंतिम मतदार यादी जाहीर होणार आहे. यानंतर १५ दिवसात प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर होईल.
जिल्हा मध्यवर्ती बॅँक ही जिल्ह्यातील सर्व सहकारी संस्थांची शिखर बॅँक आहे. यात विकास सोसायट्या, नागरी बॅँका, पतसंस्था, दूध संस्था, प्रक्रिया संस्था, सूतगिरणी, मजूर सोसायट्या यांच्यासह विविध सहकारी संस्थांचा समावेश आहे. या संस्थांच्या संचालक मंडळाच्या सभेत संस्थेच्यावतीने जिल्हा बॅँकेच्या निवडणुकीत मतदान करण्यासाठी एका सभासदाला अधिकार दिला जातो.
याचा ठराव करून तसेच जिल्हा उपनिबंधकांना कळवावे लागते. हे ठराव एकत्रित करून त्या त्या गटातील मतदार सभासदांची मतदार यादी तयार केली जाते. राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी सर्व गटातील सभासद मतदान करतात.
मागील पंचवार्षिक निवडणूक ६ मे १९१५ रोजी झाली होती. त्यामुळे यावेळी एप्रिल किंवा मे महिन्यात निवडणूक होण्याची शक्यता आहे.