जिल्हा बँक संचालकांमध्ये खडाजंगी : ‘वसंतदादा’च्या करारावरून वादंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2018 12:06 AM2018-07-10T00:06:48+5:302018-07-10T00:07:10+5:30

District Bank Directors Khandajangi: The controversy over the contract of 'Vasantdada' | जिल्हा बँक संचालकांमध्ये खडाजंगी : ‘वसंतदादा’च्या करारावरून वादंग

जिल्हा बँक संचालकांमध्ये खडाजंगी : ‘वसंतदादा’च्या करारावरून वादंग

Next
ठळक मुद्दे३० कोटी रुपये कंपनीस परस्पर दिल्यावरून विक्रम सावंत यांचा संताप

सांगली : दत्त इंडिया कंपनीकडून घेतलेल्या ६० कोटी रुपयांच्या सुरक्षा अनामत रकमेतील ३० कोटी रुपये जिल्हा बँकेने वसंतदादा कारखान्याला दिल्यामुळे जिल्हा बँक संचालक मंडळाच्या बैठकीत सोमवारी जोरदार वादावादी झाली. काँग्रेसचे विक्रम सावंत यांनी याबाबत जाब विचारल्यानंतर, प्रताप पाटील व त्यांच्यात खडाजंगी झाली.

जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाची सभा दिलीपतात्या पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. वसंतदादा कारखान्याने ९३ कोटी रुपयांची थकबाकी न भरल्यामुळे जिल्हा बँकेने मार्च २०१७ मध्ये वसंतदादा कारखान्याचा ताबा घेतला. त्यानंतर कारखाना भाडेतत्त्वावर देण्यासाठी निविदा काढली. १८ मे २०१७ रोजी दत्त इंडियाने दहा वर्षे मुदत आणि प्रतिटन गाळपासाठी २६१ रुपये दराची निविदा सादर केल्याने व त्यांची सर्वाधिक दराची निविदा ठरल्याने कारखाना त्यांना भाडेतत्त्वावर देण्यात आला. जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत ५ जुलै २०१७ रोजी याबाबतचा निर्णय झाला.

निविदेतील अटीप्रमाणे ६० कोटी रुपये सुरक्षा अनामत जिल्हा बँकेकडे जमा केल्यानंतरच अंतिम करार झाला. या सुरक्षा अनामत रकमेवरून सुरुवातीपासूनच वाद निर्माण झाले होते. या रकमेतून कामगार, शेतकरी यांची देणी किती द्यायची, शासकीय देणी किती द्यायची व जिल्हा बँकेने त्यातील किती रक्कम ठेवायची, याबाबत नियोजन झाले.

नियोजनानुसार जिल्हा बँकेने ३० कोटी रुपये स्वत:जवळ ठेवून उर्वरित ३० कोटी रुपये देणी देण्यासाठी कारखान्याला दिले. वास्तविक ही ६० कोटी अनामत रक्कम करार संपल्यानंतर पुन्हा कंपनीला परत करायची आहे. असे असताना त्यातील ३० कोटी रुपये वसंतदादा कारखान्याला कोणत्या कायद्याच्या आधारे दिले?, असा सवाल विक्रम सावंत यांनी उपस्थित केला. ३० कोटीच्या या चुकीच्या तरतुदीमुळे जिल्हा बँकेचा तोटा झाल्याचा निष्कर्ष बँकेचे लेखाधिकारी बापट यांनी काढला आहे. याचा दाखला सावंत यांनी बैठकीत दिला.

विक्रम सावंत आक्रमक झाले असतानाच संचालक प्रताप पाटील यांनी याप्रकरणी स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला. बँकेचे यामुळे नुकसान झाले नसल्याचे प्रताप पाटील यांनी सांगितले व त्यामुळे दोन्ही संचालकांमध्ये जोरदार खडाजंगी झाल्याचे समजते.

करार पुन्हा वादात
जिल्हा बॅँक आणि दत्त इंडिया कंपनी यांच्यात झालेल्या करारावरून गेले वर्षभर वाद सुरू आहे. सुरुवातीला निवृत्त कामगारांची कृती समिती, शेतकरी संघटना यांनी कराराच्या गोपनीयतेबद्दल टीका केली होती. याप्रश्नी आंदोलनही करण्यात आले होते. काही महिने हा वाद शांत झाल्यानंतर आता संचालक मंडळातील गरमागरमीवरून पुन्हा तो चर्चेत आला आहे. वसंतदादा कारखाना दत्त इंडिया कंपनीकडे दहा वर्षे ताब्यात राहणार आहे. या करारात कोणत्याही त्रुटी राहिल्या तर जिल्हा बॅँक संचालक मंडळ अडचणीत येऊ शकते. करारामध्ये यासंदर्भात नेमक्या कोणत्या गोष्टींचा उल्लेख करण्यात आला आहे, याबाबत अद्याप कोणालाही स्पष्ट कल्पना नाही. शेतकरी संघटना, कामगारांनी आक्षेप घेतल्यानंतर आता जिल्हा बँकेचे संचालकही करारावरून आक्रमक होताना दिसत आहेत.

जुन्या वादाला तोंड
मागील काही वर्षांपासून संचालक विशाल पाटील आणि विक्रमसिंह सावंत यांच्यात अंतर्गत वाद सुरू आहे. यापूवीर्ही जिल्हा बँकेच्या सभेत दोघांमध्ये वाद उफाळून आला होता, परंतु सोमवारी झालेल्या बैठकीला विशाल पाटील उपस्थित नव्हते. वसंतदादा कारखान्याच्या भाडे करारातील त्रुटीचा मुद्दा विक्रम सावंत यांनी उपस्थित केला. त्यामुळे दोन्ही युवा नेत्यांतील वाद उफाळून आल्याचे यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे.

चर्चेबद्दल गोपनीयता
बँकेचे अध्यक्ष पाटील यांच्याशी यासंदर्भात संपर्क होऊ शकला नाही. दुसरीकडे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनीही याबाबत माहिती देण्यास नकार दिला. एकूणच या प्रकाराबद्दल कमालीची गोपनीयता बाळगण्यात आली आहे.

Web Title: District Bank Directors Khandajangi: The controversy over the contract of 'Vasantdada'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.