पवारांसमोर जिल्हा बँकेची नकारघंटा
By admin | Published: July 16, 2015 12:14 AM2015-07-16T00:14:06+5:302015-07-16T00:14:06+5:30
‘सर्वोदय’चे कर्ज प्रकरण : कागदपत्रे दाखविण्यास इन्कार
सांगली : कारंदवाडी येथील सर्वोदय शेतकरी सहकारी साखर कारखान्यास राजारामबापू कारखान्याचे युनिट म्हणून केलेला कर्जपुरवठा आता वादात सापडला आहे. यासंदर्भात सर्वोदय कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज पवार यांनी जिल्हा बँकेच्या व्यवस्थापकीय संचालकांकडे कर्ज प्र्रकरणाच्या कागदपत्रांची मागणी केली, मात्र अधिकाऱ्यांनी, पवारांचा या कारखान्याशी काही संबंध नसल्याचे सांगून कागदपत्रे व कर्ज प्रकरणाविषयीची कोणतीही माहिती देण्यास नकार दिला.
यासंदर्भात पवार यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, सर्वोदय साखर कारखान्याच्या नावे राजारामबापू कारखान्यास कर्ज दिले आहे. याची माहिती घेण्यासाठी जिल्हा बँकेतील अधिकाऱ्यांना आम्ही भेटलो. त्यावेळी त्यांनी ‘सर्वोदय’ला मालतारण दिले आहे, मात्र मालतारण दिलेली साखरपोती ही कारंदवाडी येथे नसून साखराळेच्या गोदामात आहेत, असे सांगितले. कर्ज मागणीची प्रत मागितल्यानंतर त्यांनी आपणास त्रयस्थ व्यक्ती ठरवून माहिती देण्यास नकार दिला. सर्वोदय सहकारी साखर कारखाना जिल्हा बँकेचा सभासद आहे. तसेच कर्ज प्रस्ताव व कर्ज मंजुरी ‘सर्वोदय’च्या नावाने आहे. तरीही अधिकाऱ्यांनी आम्हाला अध्यक्ष असूनही त्रयस्थ व्यक्ती ठरविले आहे.
राजारामबापूंनंतर एकेकाळी १ जीप मिळण्यासाठी राजारामबापू कारखान्यात कोणी बंड केले होते, याचे अजूनही बरेच साक्षीदार आहेत, असा इशारा त्यांनी दिला. (प्रतिनिधी)
जयंतराव कसे चालतात?
बँकेकडे माहिती मागितली म्हणून आम्हाला त्रयस्थ व्यक्ती ठरविणाऱ्या व्यवस्थापकीय संचालकांनी जयंत पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या जिल्हा बँकेच्या बैठकीत कोणत्या कायद्यान्वये बँकेची माहिती दिली? जयंत पाटील हे त्रयस्थ नव्हते का? , असे सवाल पवार यांनी उपस्थित केले आहेत.