जिल्हा बँकेच्या मतदार याद्यांवरील १९ हरकती फेटाळल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:30 AM2021-09-23T04:30:48+5:302021-09-23T04:30:48+5:30
सांगली : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या प्रारूप मतदार यादीवर दाखल झालेल्या एकूण ५० हरकतींपैकी १९ हरकती फेटाळण्यात आल्या असून, ३१ ...
सांगली : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या प्रारूप मतदार यादीवर दाखल झालेल्या एकूण ५० हरकतींपैकी १९ हरकती फेटाळण्यात आल्या असून, ३१ हरकती मान्य करण्यात आल्या आहेत. जत तालुक्यातील एक संस्थाही अपात्र ठरविण्यात आली आहे.
सांगलीसह राज्यातील १२ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकांच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. एकाचवेळी ही प्रक्रिया राबवण्यात येत आहे. सांगली, सातारा व कोल्हापूर जिल्ह्यांसाठी विभागीय सह निबंधकांमार्फत जिल्हा बँकांची प्रारूप मतदार यादी जाहीर केली होती. यादीवर एकूण ५० हरकती दाखल झाल्या होत्या. सुनावणी होऊन बुधवारी त्याचा निकाल जाहीर करण्यात आला.
विहित मुदतीत ठराव प्राप्त न झाल्याच्या एकूण १२ हरकती दाखल झाल्या होत्या. या सर्व अमान्य करण्यात आल्या. प्रतिनिधी मृत झाल्याने नवीन ठरावाबाबत दाखल झालेल्या सर्वच्या सर्व २६ हरकती मान्य करण्यात आल्या. प्रतिनिधी नाव दुरुस्तीची १, प्रतिनिधी थकबाकीदाराची १, प्रतिनिधी राजीनाम्याची १ व संस्था अवसायनात नसल्याबाबतची १ हरकत दाखल झाली होती. या सर्व हरकती मान्य करण्यात आल्या.
संस्था थकबाकीत असल्याबाबत, अक्रियाशील सभासदबाबत दाखल प्रत्येकी एक हरकत अमान्य करण्यात आली. बेकायदेशीर ठरावाबद्दलच्या एकूण ४ हरकतींपैकी ३ अमान्य व १ मान्य करण्यात आली. सांगली जिल्हा बॅँकेच्या प्रारूप मतदारयादीत २५७३ मतदार सभासद आहेत. यात २२१९ संस्था सभासद आहेत. येत्या २७ सप्टेंबर रोजी जिल्हा बँकेची अंतिम मतदारयादी प्रसिद्ध केली जाणार आहे.
चौकट
संस्था अपात्रचा निर्णय
गट अ मधील जत तालुक्यातील उंटवाडी विकास सहकारी सोसायटी व ठरावधारक मतदार यादीत समाविष्ट करण्यास अपात्र ठरविण्यात आले आहेत.
चौकट
गटनिहाय मान्य, अमान्य हरकती
गट एकूण हरकती मान्य अमान्य
अ १९ १६ ३
क-१ ४ २ २
क-२ २ २ ०
क-३ १५ ८ ७
क-४ १० ३ ७
एकूण ५० ३१ १९