महांकाली कारखान्याची जमीन विक्री परवानगी रद्दचा जिल्हा बँकेचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2023 04:34 PM2023-04-13T16:34:23+5:302023-04-13T16:34:52+5:30
येत्या पंधरा दिवसांत पैसे जमा न झाल्यास जमीन विक्रीची परवानगी रद्द करण्यात येईल
सांगली : कवठेमहांकाळ येथील महांकाली साखर कारखान्याने करारानुसार मार्चपर्यंत २८ कोटींची थकबाकी न भरल्याने जिल्हा बँकेने कारखान्यास नोटीस बजावली आहे. येत्या पंधरा दिवसांत पैसे जमा न झाल्यास जमीन विक्रीची परवानगी रद्द करण्यात येईल, असा इशारा बँक प्रशासनाने दिला आहे.
महांकाली साखर कारखाना थकीत कर्जाच्या वसुलीसाठी सिक्युरीटायझेशन ॲक्टअंतर्गत जिल्हा बँकेने ताब्यात घेतला होता. कारखान्याने या कारवाईच्या विरोधात ऋण वसुली प्राधिकरणाकडे आव्हान दिले होते. कारखान्याची सुमारे ८० एकर जमीन विक्री करून जिल्हा बँकेचे कर्ज परतफेड करण्याची तयारी असल्याचे कारखान्याने प्राधिकरणासमोर सांगितले. यासाठी तीन वर्षांची मुदतही मागितली होती. प्राधिकरणाने कारखान्याचा हा प्रस्ताव मान्य करत जिल्हा बँकेला तसे आदेश दिले होते.
त्यानंतर चर्चेतून मार्ग काढत जिल्हा बँकेने जमीन विक्री करण्यास परवानगी दिल्यास कारखाना सप्टेंबर २०२३ पर्यंत बँकेचे सर्व कर्ज हप्त्याने परत करेल, असे ठरले. यावर बँकेच्या संचालक मंडळाने शिक्कामोर्तब केले. ठरल्याप्रमाणे हप्ते न भरल्यास कारखान्याच्या जमीन विक्रीला दिलेली परवानगी रद्द करण्याची अट बँकेने करारात घातली होती. जिल्हा बँक, महांकाली कारखाना व जमीन विकसकात हा करार झाला आहे. मार्च २०२३ पर्यंत कारखान्याला २८ कोटींचा हप्ता जमा करायचा होता. तो त्यांनी जमा न केल्याने बँकेने जमीन विक्री परवाना रद्दची नोटीस दिली आहे.
कारखान्याचे ११७ कोटी येणे
महांकाली कारखान्याची कर्ज थकबाकी १४० कोटींची होती. कारखान्याने ओटीएसचा लाभ घेतल्याने आता ११७ कोटी येणे आहेत. मार्चअखेर कारखान्याने ३५ कोटी रुपये जिल्हा बँकेला भरणे अपेक्षित होते. करारावेळी व नंतर काही रक्कम कारखान्याने जमा केली होती. त्यामुळे मार्चअखेर २८ कोटी जमा व्हायला हवे होते. ती रक्कम जमा झालेली नाही.
अडचणीत वाढ
सध्या कारखान्याच्या जमीन विक्रीची प्रक्रिया सुरू आहे. अशातच जिल्हा बँकेने नोटीस बजावली असल्याने कारखान्याच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यांना पंधरा दिवसांची मुदत असून, या काळात थकबाकी भरण्याबाबत कारखाना नेमकी काय भूमिका घेणार याकडे बँकेचे लक्ष लागले आहे.