‘वसंतदादा’ची निविदा जिल्हा बँक काढणार!

By admin | Published: March 26, 2017 11:37 PM2017-03-26T23:37:44+5:302017-03-26T23:37:44+5:30

थकबाकीपोटी घेणार कारखान्याचा ताबा; संचालक मंडळाच्या बैठकीत आज निर्णय शक्य

District bank will send tenders for Vasantdada! | ‘वसंतदादा’ची निविदा जिल्हा बँक काढणार!

‘वसंतदादा’ची निविदा जिल्हा बँक काढणार!

Next



सांगली : थकीत ८५ कोटींच्या कर्ज वसुलीपोटी जिल्हा बँकेमार्फत वसंतदादा साखर कारखान्याचा ताबा घेण्यात येणार आहे. भाडेतत्त्वावर हा कारखाना चालविण्यास देण्याची निविदाही बँकेमार्फत काढण्याच्या हालचाली सुरू आहेत. आज, सोमवारी संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय होण्याची चिन्हे आहेत.
जिल्हा बॅँकेने वसुलीसाठी जोरदार मोहीम हाती घेतली आहे. गेल्या वर्षीही वसंतदादा शेतकरी सहकारी कारखान्यास जप्तीची नोटीस बजावली होती. त्यामुळे मार्चअखेरीस कारखान्याने ६२ कोटी रुपयांची थकबाकी जमा करून त्यांचे खाते नियमित केले होते. यावेळी पुन्हा सुमारे ८५ कोटी रुपयांच्या वसुलीसाठी वारंवार नोटिसा बजावण्यात आल्या. नोटिसांना प्रतिसाद न मिळाल्याने जिल्हा बॅँकेने जानेवारी महिन्यात सिक्युरिटायझेशन अ‍ॅक्टनुसार त्यांना नोटीस बजावली आहे. ३१ मार्चपर्यंत थकबाकीची रक्कम जमा केली नाही, तर एप्रिलमध्ये कारखान्याचा ताबा घेऊन कारखाना भाडेतत्त्वावर चालविण्यास देण्याची प्रक्रिया जिल्हा बॅँक राबवू शकते. त्यासाठीच्या हालचाली सुरू झाल्या असून, बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत सोमवारी याबाबतचा निर्णय होण्याची शक्यता आहे.
जिल्हा बॅँकेला यंदा शंभर कोटी रुपयांच्या नफ्याचे उद्दिष्ट आहे. नोटाबंदीचा मोठा फटका बसल्याने उद्दिष्टपूर्ती कठीण ठरण्याची चिन्हे होती. तरीही बॅँकेचे अध्यक्ष आणि प्रशासनाने यातून मार्ग काढत चांगल्या वसुलीच्या दिशेने पावले टाकली आहेत. वसंतदादा कारखान्यासह माणगंगा सूतगिरणी, माणगंगा साखर कारखाना आणि माणगंगा गारमेंट या थकबाकीदारांना जिल्हा बँकेने नोटिसा बजावल्या आहेत. या चार संस्थांची थकबाकी दीडशे कोटींच्या घरात आहे. त्यामुळे ही वसुली झाली, तर जिल्हा बॅँकेचे यंदाचे शंभर कोटी नफ्याचे उद्दिष्ट साध्य होऊ शकते. त्यामुळे बॅँक प्रशासन आता सरसावले असून, कडक भूमिका स्वीकारली आहे. गतवर्षीच्या नफ्याचा विचार करता यंदाचे उद्दिष्ट फारसे अवघड नव्हते. मात्र, रिझर्व्ह बँकेच्या विचित्र धोरणामुळे बॅँकेसमोर अनेक अडचणी निर्माण झाल्या. नोटाबंदीच्या काळात दोन ते तीन महिने ठप्प असलेले जिल्ह्यातील बॅँकेचे व्यवहार आणि ३१५ कोटींच्या जुन्या शिल्लक रकमेवरील व्याजाचा फटका या दोन गोष्टी सर्वांत जास्त चिंतेच्या होत्या. तरीही मोठ्या थकबाकीदारांवर लक्ष केंद्रित करून उद्दिष्टपूर्ती करण्याची धडपड सुरू आहे. (प्रतिनिधी)

Web Title: District bank will send tenders for Vasantdada!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.