पुरग्रस्त कसबे डिग्रज, मौजे डिग्रज गावांची जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:08 PM2021-07-31T16:08:15+5:302021-07-31T16:28:20+5:30
Flood Sangli : पुराच्या पाण्यामुळे धोकादायक किंवा पडायला झालेल्या घरांमध्ये कोणी रहायला जाणार नाही याची काळजी घ्या, नुकसान झालेल्या घरांचे व शेतीचे पंचनामे तात्काळ सुरु करा, धान्य वाटपाची कार्यवाही तात्काळ सुरु करा, शुध्द पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, स्वच्छता व आरोग्य विषयक उपाय योजनांची कार्यवाही सुरु करा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले.
सांगली : पुराच्या पाण्यामुळे धोकादायक किंवा पडायला झालेल्या घरांमध्ये कोणी रहायला जाणार नाही याची काळजी घ्या, नुकसान झालेल्या घरांचे व शेतीचे पंचनामे तात्काळ सुरु करा, धान्य वाटपाची कार्यवाही तात्काळ सुरु करा, शुध्द पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, स्वच्छता व आरोग्य विषयक उपाय योजनांची कार्यवाही सुरु करा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले.
पुरामुळे बाधीत मिरज तालुक्यातील कसबे डिग्रज व मौजे डिग्रज या गावांची जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी पाहणी करुन पुरामुळे बाधित कुटुंबांची आस्थेने विचारपूस केली. यावेळी पोलीस उपाधिक्षक अजित टिके, पोलीस निरिक्षक प्रशांत निसाणदार, अप्पर तहसिलदार अर्चना पाटील, संबधित गावांचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, तलाठी, ग्रामसेवक आदी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, शासनाकडून आर्थिक मदतीचा शासन निर्णय झाल्यानंतर लगेच शासन नियमानुसार मदत वाटपाची कार्यवाही सुरु करण्यात येईल. पंचनामे गतीने करण्यासाठी महसूल, कृषी व इतर विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी टीम तयार करुन पंचनाम्याची कार्यवाही लवकरात लवकर पुर्ण करावी. गावातील पाणी पुरवठ्याच्या योजना तात्काळ सुरु कराव्यात. गरज असल्यास तोपर्यंत टँकरने पाणी पुरवठा करण्यात येईल.
यावेळी मौजे डिग्रज येथील स्थानिक नागरिकांनी गावातील प्राथमिक आरोग्य केंद्र प्रत्येक पुराच्या वेळी पाण्याखाली जाते, त्यामुळे त्याचे कायमस्वरुपी स्थलांतरणाची कार्यवाही करावी. तसेच औषध फवारणीसाठीचे साहित्य उपलब्ध करुन द्यावे, अशी मागणी केली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या स्थालांतरणाबाबत निर्णय घेण्यात येईल. तसेच औषध फवारणीसाठीचे साहित्य तात्काळ उपलब्ध करुन देण्याच्या सूचना तालुका प्रशासनाला दिल्या.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी कसबे डिग्रज व मौजे डिग्रज गावातील पूरग्रस्त कुटंबांना धान्य वाटप केले. ज्या ठिकाणी पुराचे पाणी आले होते त्या ठिकाणांची प्रत्यक्ष पाहणी केली. स्थलांतरीत होऊन घरी परतलेल्या पूरग्रस्त कुटुंबियांची भेट घेतली.