चिंचलीच्या मायाक्काचे दर्शन बंदचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:39 AM2021-02-23T04:39:50+5:302021-02-23T04:39:50+5:30
ओळ : चिंचली (ता. रायबाग ) येथील मायाक्का देवीचे मंदिर शनिवारपासून भाविकांसाठी बंद करण्यात आले. लोकमत न्यूज नेटवर्क सांगली ...
ओळ : चिंचली (ता. रायबाग ) येथील मायाक्का देवीचे मंदिर शनिवारपासून भाविकांसाठी बंद करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : चिंचली (ता. रायबाग ) येथील प्रसिद्ध मायाक्का देवीचे मंदिर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार सर्वसामान्यांसाठी बंद करण्यात आले आहे. त्यामुळे २६ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या यात्रेवर कोरोनाचे सावट निर्माण झाले आहे.
देवस्थान विश्वस्त समितीने यंदाही यात्रा निर्विघ्नपणे पार पडणार असल्याचे स्पष्ट केले होते. यात्रेतील धार्मिक कार्यक्रमांची जाहिरातही प्रसिद्ध केली होती. कार्यक्रमांची तयारीही सुरू होती. गेल्या तीन-चार दिवसांत कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागल्याने यात्रेचा फेरविचार करण्याची वेळ आली आहे. विशेषत: महाराष्ट्रात फैलाव वाढल्याने चिंतेचे वातावरण आहे. यात्रेसाठी महाराष्ट्रातून लाखोच्या संख्येने भाविक जातात. त्यामुळे देवीचे मंदिर बंद करण्याचा निर्णय बेळगावचे जिल्हाधिकारी एस. जी. हिरेमठ यांनी शनिवारी सायंकाळी जाहीर केला. पुढील आदेशापर्यंत मंदिर बंद राहील. देवीचे नित्योपचार मोजक्या लोकांच्या उपस्थितीत कोरोनाचे नियम पाळत केले जातील, असेही आदेशात म्हटले आहे.
यामुळे यात्रेविषयी साशंकता निर्माण झाली आहे. यात्रा होणार की नाही याविषयी जिल्हा प्रशासन व मंदिर विश्वस्त समितीने कोणताही स्पष्ट निर्णय अद्याप जाहीर केलेला नाही. मात्र, मंदिर बंद ठेवल्याने ती होणार नाही हे स्पष्ट आहे. कोरोनामुळे गेल्या मार्चपासून मंदिर बंद होते. १ फेब्रुवारीपासून उघडण्यात आले, त्यानंतर अवघ्या वीसच दिवसांत पुन्हा बंद झाले आहे.
चौकट
सौंदत्ती, जोगभावी मंदिरेही बंद
सौंदत्ती येथील रेणुकादेवीचे मंदिर तसेच जोगुळभावी येथील सत्यम्मादेवीचे मंदिरही जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार बंद करण्यात आले. पुढील आदेशापर्यंत ती बंदच राहतील. देवीचे नित्योपचार कोरोनाचे नियम पाळत मोजक्या पुजाऱ्यांच्या उपस्थितीत सुरू राहतील.
चौकट
कागवाड सीमेवर चेकपोस्ट
कर्नाटक सरकारने रविवारी कागवाडमध्ये चेकपोस्ट उभारले. प्रत्येक प्रवाशाला तपासणीनंतरच कर्नाटकात सोडले जात आहे. लवकरच कोरोना प्रमाणपत्राचीही सक्ती होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र-कर्नाटकदरम्यानची एसटी वाहतूकही शनिवारपासून रोडावली. रविवारी दिवसभरात कर्नाटकच्या तीन-चार गाड्याच आल्या, तर महाराष्ट्रातूनही मोजक्याच गाड्या सुटल्या.