सांगलीत पेट्रोल पंपांवर सर्व सुविधा देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2021 17:49 IST2021-06-14T17:47:10+5:302021-06-14T17:49:22+5:30
Bjp PetrolPump Sangi : सांगली जिल्ह्यातील पेट्रोल पंपांवर वाहनधारकांना मोफत हवा, पिण्याचे पाणी व स्वछतागृह आदी सुविधा त्वरीत उपलब्ध करण्याची मागणी भाजपने केली. अनेक पंपांवर सुविधा नसल्याने गैरसोय होत असल्याची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. त्यानुसार सुविधा उपलब्ध करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

सांगलीत आमदार सुरेश खाडे यांनी जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चाौधरी यांना पेट्रोल पंपांवरील सुविधांसाठी निवेदन दिले, यावेळी मोहन वनखंडे, रवीकांत साळुंखे, ओंकार शुक्ल आदी उपस्थित होते.
सांगली : जिल्ह्यातील पेट्रोल पंपांवर वाहनधारकांना मोफत हवा, पिण्याचे पाणी व स्वछतागृह आदी सुविधा त्वरीत उपलब्ध करण्याची मागणी भाजपने केली. अनेक पंपांवर सुविधा नसल्याने गैरसोय होत असल्याची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. त्यानुसार सुविधा उपलब्ध करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
आमदार सुरेश खाडे, भाजपचे सरचिटणीस रवींकांत साळुंखे, मोहन वनखंडे, रोहित चिवटे, ओंकार शुक्ल, महेश पाटील, प्रशांत कुलकर्णी, मनोज पाटील आदींनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. त्यांनी सांगितले की, कोरोना व लॉकडाऊनमुळे वाहनधारकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
इंधन भरण्यासाठी पंपावर गेल्यास तेथे हवा, पिण्याचे पाणी व स्वछतागृह आदी सुविधा मिळत नाहीत. स्वच्छतागृहे अस्वच्छ, नादुरुस्त व गैरसोयीची आहेत. काही ठिकाणी कुलुप लाऊन बंद केली आहेत. यामध्ये महिला वाहनधारकांची मोठी कुचंबणा होते. हवा भरण्याची यंत्रे सर्रास ठिकाणी बंद अवस्थेत आहेत. याची दखल घेऊन पंपचालकांना आवश्यक कार्यवाहीचे आदेश तातडीने द्यावेत.
लॉकडाऊन काळात गॅरेज बंद असल्याने वाहनधारकांना पंपांवरील हवेशिवाय पर्याय नव्हता, पण पंपचालकांच्या बेफिकिरीमुळे सर्रास यंत्रे बंद पडल्याकडे कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. चौधरी, पुरवठा अधिकारी वसुंधरा बारवे व आमदार खाडे यांची बैठक झाली. पंपांवरील सुविधांविषयी चर्चा झाली. सर्व पंपांवर आठ दिवसांत सुविधा उपलब्ध करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.