मिरजेत भाजीमंडईच्या जागेवरील अतिक्रमण हटविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:22 AM2021-01-09T04:22:28+5:302021-01-09T04:22:28+5:30
याबाबत ‘ मी मिरजकर’ फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन खंदकातील शासकीय जागेवरील अतिक्रमणाकडे लक्ष वेधले. मिरजेत भाजीमार्केटचे ...
याबाबत ‘ मी मिरजकर’ फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन खंदकातील शासकीय जागेवरील अतिक्रमणाकडे लक्ष वेधले. मिरजेत भाजीमार्केटचे काम रखडल्याने भाजीविक्रेत्यांनी रस्त्यावर ठाण मांडले आहे. रस्त्यावरील विक्रेत्यांना नवीन भाजीमार्केटचे काम पूर्ण होईपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात हायस्कूल रस्त्यालगत असलेल्या खंदकात भाजी मंडईची व्यवस्था करण्याची मागणी ‘मी मिरजकर’ फाउंडेशनने केली आहे. त्यानुसार महापालिका उपायुक्त स्मृती पाटील व तहसीलदार डी. एस. कुंभार यांनी भाजीबाजारासाठी खंदकातील जागेची पाहणी केली. येथे तात्पुरती भाजी मंडई सुरू करण्यासाठी या जागेची स्वच्छता व सपाटीकरणाचे काम सुरू करण्यापूर्वीच काहीजणांनी या जागेच्या मालकीचा दावा करून रातोरात कुंपण घालून अतिक्रमण केले आहे.
याबाबत मी मिरजकर फाैंडेशनच्या तक्रारीनंतर तहसीलदार डी. एस. कुंभार यांनी महापालिका उपायुक्तांना शासनाच्या जागेवरील अतिक्रमण हटविण्याच्या सूचना दिल्या. उपायुक्त स्मृती पाटील यांनीही सहायक आयुक्तांना याबाबत आदेश दिले. जिल्हाधिकारी डाॅ. अभिजित चाैधरी यांचीही फाैंडेशनच्या सदस्यांनी भेट घेऊन याकडे लक्ष वेधले. जिल्हाधिकाऱ्यांनी महापालिकेस संबंधित जागेवरील अतिक्रमणे हटविण्याचे आदेश दिले. यावेळी सुधाकर खाडे, महादेव कोरे, मनोहर कुरणे, उमेश कुरणे, नितीन सोनवणे, प्रशांत लोखंडे, सुधीर गोखले उपस्थित होते.