जिल्हाधिकाऱ्यांकडून राजकारण्यांचा ‘क्लास’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2019 10:56 PM2019-03-25T22:56:07+5:302019-03-25T22:57:00+5:30
लोकसभा निवडणुकीची अधिसूचना गुरुवार दि. २८ मार्चला जारी होणार असून, तेव्हापासून ४ एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. या पार्श्वभूमीवर उमेदवारी
सांगली : लोकसभा निवडणुकीची अधिसूचना गुरुवार दि. २८ मार्चला जारी होणार असून, तेव्हापासून ४ एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्जाची माहिती व्हावी व त्यातील सर्व माहिती भरण्याविषयीच्या शंकांचे निरसन करण्यासाठी सोमवारी जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला.
उमेदवारी अर्जातील प्रत्येक घटकाबाबत माहिती देत, उमेदवारांनी द्यावयाच्या माहितीबाबतही त्यांनी सूचना दिल्या.उमेदवारी अर्ज भरताना आवश्यक प्रतिज्ञापत्रे, शपथपत्रे, अनामत रक्कम भरल्याबाबतची पावती, मतदार यादीतील माहिती द्यावी लागणार आहे. यातील एकही माहिती अपूर्ण भरल्यास अर्ज बाद होऊ शकतो. त्यामुळे उमेदवारांनी याची काळजी घेत, सर्व माहिती भरण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.
२८ मार्चपासून ४ एप्रिलपर्यंत सकाळी ११ ते ३ पर्यंतच अर्ज दाखल करून घेतले जाणार आहेत. रविवारी अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. उमेदवारी अर्ज दाखल करताना स्वत: उमेदवार अथवा सूचक उपस्थित राहणे आवश्यक आहे. ज्या राजकीय पक्षांकडून उमेदवारी दाखल केली जाणार आहे, त्याचे नाव, चिन्ह व महत्त्वाचे म्हणजे प्रत्येक उमेदवाराने आपले नाव न चुकता लिहावे, याबाबत सूचना देण्यात आल्या.
उमेदवारांनी अर्ज दाखल करण्याच्या आदल्या दिवशी बॅँकेत खाते उघडणे आवश्यक असून, त्या दिवसापासून निकाल लागेपर्यंत या खात्यावरील व्यवहाराची माहिती प्रशासनाला सादर करावी. एखाद्या उमेदवारावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे असतील, तर त्याने ती माहिती न लपविता द्यावी, असे आवाहनही जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांनी केले.
कार्यालयासमोर गर्दी नको
जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी म्हणाले, उमेदवारी अर्ज दाखल करताना उमेदवारांनी व त्यांच्या प्रतिनिधींनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील १०० मीटर परिसरात वाहनांची गर्दी करू नये. अर्ज दाखल करताना केवळ पाचच व्यक्तींना परवानगी देण्यात येणार आहे.