जि. प.वर काँग्रेसचा झेंडा फडकवा
By admin | Published: August 5, 2016 11:24 PM2016-08-05T23:24:21+5:302016-08-06T00:27:11+5:30
मोहनराव कदम : शिराळा येथे कार्यकर्त्यांची बैठक; निवडणूक ताकदीने लढणार
शिराळा : जिल्हा परिषदेवर काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकविण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. शिराळा तालुक्यात काँग्रेस मजबूत असून येथील जनता काँग्रेसवर प्रेम करणारी आहे, असे प्रतिपादन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम यांनी केले.
शिराळा येथे आयोजित कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस सत्यजित देशमुख प्रमुख उपस्थित होते. तालुका काँग्रेस अध्यक्ष हणमंतराव पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.
मोहनराव कदम म्हणाले, जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला चांगले वातावरण आहे. मी प्रत्येक तालुक्याचा दौरा नुकताच पूर्ण केला आहे. त्याठिकाणच्या अडचणी समजावून घेतल्या आहेत. अडचणींची सोडवणूक निश्चितपणे केली जाईल. सर्वत्र चांगली स्थिती आहे. जिल्ह्यात पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणूक ताकदीने लढवून जिंकून दाखवू.
सत्यजित देशमुख म्हणाले, शिराळा विधानसभा मतदार संघामध्ये काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून काँग्रेस कार्यकर्त्याला ताकद देण्याचे काम केले आहे. येणाऱ्या पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेसला चांगले यश मिळेल. कार्यकर्त्यांनी या निवडणुकीच्यादृष्टीने कामाला लागावे. तालुक्यामधील आमचे विरोधक भाजप लाटेवर विजयी झाले आहेत. भाजपकडून लोकांच्या अपेक्षा फोल ठरल्याने लोकांच्या मनामध्ये नाराजी पसरली आहे. या नाराजीतूनच जनता काँंग्रेस पक्षाला साथ देईल. या मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी आ. शिवाजीराव देशमुख यांचे मोठे योगदान आहे. अनेक विकास कामे मार्गी लावण्याबरोबरच अनेक कुटुंबांचा आधार बनत अनेक कुटुंबे उभी केली आहेत, हे जनता जाणून आहे.
यावेळी तालुका काँग्रेस अध्यक्ष हणमंतराव पाटील, माजी जि. प. सदस्य के. डी. पाटील, महादेव कदम, जिल्हा उपाध्यक्ष जयकर कदम, सतीश पाटील, सेवा दल अध्यक्ष तानाजी कुंभार, सम्राट शिंदे, अशोकराव पाटील, हातकणंगले लोकसभा युवक काँग्रेस अध्यक्ष जयराज पाटील, संदीप जाधव, कैलास पाटील, अशोक गायकवाड, पी. जी. शिंदे, रमेश पाटील, मनोहर पाटील आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. (वार्ताहर)
नाराजीचा फायदा उचला
काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक जोमाने लढण्याचे आवाहन यावेळी नेत्यांनी केले. शिराळा तालुक्यातील विरोधक भाजप लाटेवर विजयी झाले आहेत. भाजपकडून लोकांच्या अपेक्षा फोल ठरल्याने लोकांच्या मनामध्ये नाराजी पसरली आहे, असेही यावेळी सत्यजित देशमुख कार्यकर्त्याना म्हणाले.