जिल्ह्यामध्ये मोहरम उत्साहात

By admin | Published: November 4, 2014 10:06 PM2014-11-04T22:06:14+5:302014-11-05T00:06:10+5:30

ताबुतांच्या भेटीचा सोहळा अपूर्व उत्साहात व जल्लोषात पार पडला.

In the district, the excitement of Moharram | जिल्ह्यामध्ये मोहरम उत्साहात

जिल्ह्यामध्ये मोहरम उत्साहात

Next

सांगली : जिल्ह्यात आज (मंगळवार) मोहरमनिमित्त विविध गावांमध्ये ताबुतांच्या भेटीचा सोहळा अपूर्व उत्साहात व जल्लोषात पार पडला.
खानापूर : खानापूर येथील मोहरम (डोला) सणास मोठ्या उत्साही वातावरणात सुरुवात झाली आहे. पहिल्यादिवशी खत्तलरात्र, तर दुसऱ्यादिवशी सोंगे व ताबूत आणि वेशीच्या भेटीचा कार्यक्रम पार पडला.
मोहरम सर्वत्र दोन दिवस साजरा करतात. मात्र खानापूर येथे तो तब्बल तीन दिवस साजरा केला जातो. खानापूर येथे मोहरमला ‘डोला’ या नावाने संबोधले जाते. हा सण बाल हनुमान नाट्य मंडळ व बाल सन्मित्र नाट्य मंडळ एकत्रितपणे ऐतिहासिक मॉँसाहेब दर्ग्यात साजरा करतात.
पहिला दिवस खत्तलरात्र म्हणून साजरा झाला. यावेळी खानापूर व परिसरातील हजारो भाविकांनी मॉँसाहेब दर्ग्यात दर्शनासाठी गर्दी केली होती. यावेळी मलिद्याचा नैवेद्य दाखविला गेला. दुसरा दिवस ताबूत व वेशीच्या भेटीने सुरू झाला. यानंतर दिवसभर दोन्ही मंडळांच्या कार्यकर्त्यांनी व कलाकारांनी उपस्थित भाविकांच्या करमणुकीसाठी विविध रूपातील सोंगे काढली. दोन दिवसात बाल हनुमान नाट्य मंडळाने ‘लावणीत भडकला अंगार’ व ‘घुंगरात रंगला पाटील’, तर बाल सन्मित्र नाट्य मंडळाने ‘लग्नाआधी वरात’ व ‘रक्ताचा टिळा’ आदी स्थानिक कलाकारांनी कामे केलेली नाटके सादर केली. बुधवारी नवस घेणे, फेडणे, नालसाहेब दर्शन व विसर्जन असून, मॉँसाहेब दर्ग्यात कुस्त्यांचे मैदान आयोजित केले आहे. गुरुवारी नार्ता कार्यक्रम पाहून मोहरमची सांगता होणार आहे.
कवठेएकंद : कवठेएकंद (ता. तासगाव) येथे मुस्लिम बांधवांच्यावतीने पीर हसन हुसेन पंजाची स्थापना करण्यात येऊन मोहरम साजरा करण्यात आला. सोमवारी रात्री नैवेद्य देऊन खत्तल रात्रीचा आलावा छापण्याचा कार्यक्रम झाला. समस्त हिंदू-मुस्लिम बांधवांनी मलिद्याचा नैवेद्य केला. आज (मंगळवारी) पिरांच्या भेटीचा कार्यक्रम झाला. त्यामध्ये नागाव-कवठे, कवठेएकंद येथील पिरांचा सहभाग होता. सायंकाळी उशिरा सवाद्य मिरवणूक होऊन रात्री विसर्जन करण्यात आले.
वाळवा : कोटभाग—वाळवा येथे मोहरमनिमित्त जुम्मा मस्जिद येथे काल (सोमवारी) मलिदा (नैवेद्य) नववीचा कार्यक्रम झाला. आज दहावीला चोंगी नैवेद्य व रोट तोडण्याचा कार्यक्रम होऊन ताबूत व पंजे यांची मधला मारुती मंदिराजवळील चौकात भेट झाली. यानंतर विसर्जन झाले.
वाळव्यात जुम्मा मस्जिद (मुख्य ठिकाण), कोटभाग येथे डोला (ताबूत) व पंजे, देशचौगुले म्हणजे वाळव्याचे सरकार व फकीर यांच्यावतीने मधला मारुती मंदिराजवळ तीन पंजे व ताबूत, पेठभाग वाळवा येथे जगताप टेलर यांच्या घराजवळील अम्माजान दर्गा येथे ताबूत, सय्यदबार येथे चार पंजे व ताबूत, परीटवाडा—पेठभाग येथील काळी मस्जिद येथे पंजे व ताबूत, माळभाग—वाळवा येथे तीन पंजे व ताबूत यांची स्थापना १0 दिवसांपूर्वी करण्यात आली होती. आज करबल खेळ व सरबत वाटपानंतर मधला मारुती मंदिराजवळील चौकात सर्व ताबूत—पंजांच्या भेटी झाल्या. यानंतर कृष्णा घाट येथे विसर्जन होऊन या उत्सवाची सांगता झाली.
नरवाड : नरवाड (ता. मिरज) येथे ताबुतांच्या भेटी उत्साहात पार पडल्या. मोठ्या भावाचा मान नरवाडला असल्याने म्हैसाळचे ताबूत नरवाडला येण्याची परंपरा आजही कायम आहे.
म्हैसाळचे ताबूत आपल्याबरोबर घेऊन मोठ्या दिमाखात गावात वेगवेगळ्या ठिकाणी भेटी घेतल्या. सरंजामदार संभाजीराजे शिंदे आणि पोलीस पाटील आप्पासाहेब कनप यांच्या प्रांगणात ताबुतांच्या भेटी पार पडल्या. ताबूत भेटीदरम्यान करबला खेळण्यात आला. यावेळी अबीराची उधळण करण्यात आली. भाविकांनी गर्दी केली होती. (वार्ताहर)

Web Title: In the district, the excitement of Moharram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.