जिल्ह्याचा बारावीचा निकाल ९०.७९ टक्के
By admin | Published: May 31, 2017 12:17 AM2017-05-31T00:17:08+5:302017-05-31T00:17:08+5:30
जिल्ह्याचा बारावीचा निकाल ९०.७९ टक्के
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : फेब्रुवारी-मार्चमध्ये झालेल्या बारावी परीक्षेचा आॅनलाईन निकाल मंगळवारी जाहीर झाला. सांगली जिल्ह्याचा निकाल ९०.७९ टक्के लागला असून, पुन्हा एकदा जिल्ह्यात मुलींनीच बाजी मारली आहे. उत्तीर्णांमध्ये मुलींचे सर्वाधिक ९५.७१ टक्के प्रमाण आहे. जिल्ह्यातील ३३ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला. आॅनलाईन निकाल पाहण्यासाठी नेट कॅफेमध्ये गर्दी जमली होती. तसेच अनेकांनी मोबाईलवरून निकाल पाहिला.
मंगळवारी बारावीचा आॅनलाईन निकाल जाहीर झाल्याने विद्यार्थ्यांसह पालकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. यंदा नियमित विद्यार्थ्यांच्या निकालाची टक्केवारीत वाढ झाली. या परीक्षेसाठी जिल्ह्यातील ३६ हजार ३४ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी ३२ हजार ६७४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात ११ हजार १२९ विद्यार्थ्यांना प्रथम, तर १७ हजार ९५० विद्यार्थी व्दितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले.
जिल्ह्यात विज्ञान विभागाचा सर्वाधिक ९७.९१ टक्के लागला असून, कला शाखा ८०.७९, तर वाणिज्य ९४.६०, किमान कौशल्य व्यवसाय अभ्यासक्रमाचा ९०.१२ टक्के निकालाची नोंद झाली.
गेल्या काही वर्षांपासून बारावीच्या निकालात मुलांपेक्षा मुली आघाडीवर आहेत. यंदाही पुन्हा मुलींनी बाजी मारली. १५ हजार ४७१ मुलींपैकी १४ हजार ८०७ मुली उत्तीर्ण झाल्या असून, त्याचे प्रमाण ९५.७१ टक्के आहे.
२० हजार ५१७ मुलांपैकी १७ हजार ८६७ जण उत्तीर्ण झाले. मुलांचे उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ८७.०८ टक्के आहे. जिल्ह्यातील ३० शाळांचा बारावी परीक्षेच्या निकाल शंभर टक्के लागला आहे. त्यातही व्ही. आर. लोणारी गुरुकुल, आटपाडी, रॉयल मराठा निगडीखुर्द, सोपे ज्युनिअर कॉलेज, जत, अभिजित कदम, आमणापूर, बॉईज ज्युनि. कॉलेज, कवठेमहांकाळ, अंबाई मंडळ, कवठेमहांकाळ, जीवन प्रबोधिनी, गार्डी, एन. सी. बेळंकी, मिरज, नव कृष्णा व्हॅली, कुपवाड, रामानंद विद्यालय, पलूस, प्रतिनिधी ज्युनिअर, कुंडल, किर्लोस्कर हायस्कूल, किर्लोस्करवाडी, शंकर गुरुकुल, अभिजित कदम, पलूस, ए. ए. उपाध्ये गर्ल्स, कुपवाड, राजर्षी शाहू, सांगली, रजपूत ज्युनिअर, सांगली, कोठारी ज्युनिअर, सांगली, देशमुख ज्युनिअर, हुतात्मा नागनाथ ज्युनिअर, कमला जाधव ज्युनिअर, शिराळा, गुरुकुल दादोजी कोंडदेव, तासगाव, एस. एस. माने-पाटील विद्यामंदिर, विसापूर, अॅड. आर. आर. पाटील ज्युनिअर, विसापूर, कर्मवीर भाऊराव पाटील, वाळवा व नेर्ले, इस्लामपूर ज्युनिअर, इस्लामपूर, अण्णासाहेब डांगे ज्युनिअर, आष्टा यांचा समावेश आहे.
जिल्ह्यात कडेगावचा दबदबा
बारावीच्या निकालात जिल्ह्यात कडेगाव तालुक्याने बाजी मारली आहे. कडेगाव तालुक्याचा निकाल ९७.३४ टक्के, तर सर्वात कमी कवठेमहांकाळ तालुक्याचा ८६.८६ टक्के निकाल लागला. आटपाडी तालुका ९१.७४, जत ८७.२८, खानापूर ९५.५०, मिरज ९३.२९, पलूस ९४.६७, सांगली शहर ८८.६६, शिराळा ९२.९९, तासगाव ९४.६६ आणि वाळवा तालुक्याचा ८८.९६ टक्के निकाल लागला.
पुनर्परीक्षार्थींचा निकाल ३४.७२ टक्के
जिल्ह्यातून एक हजार ३९७ पुनर्परीक्षार्थी बसले होते. त्यापैकी ४८५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, एकूण निकालाची टक्केवारी ३४.७२ इतकी आहे. चौदा विद्यार्थी प्रथम श्रेणीत, तर ३३ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.