डायग्नोस्टिक सेंटरमुळे रोग निदानात जिल्हा अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:25 AM2021-04-25T04:25:40+5:302021-04-25T04:25:40+5:30

सांगली : सांगली-मिरजेच्या आरोग्य सेवेला दीडशे वर्षांहून अधिकचा इतिहास आहे. मेडिकल हब म्हणूनही या शहरांची राज्यात ओळख आहे. त्यातही ...

The district is leading in diagnosis due to the diagnostic center | डायग्नोस्टिक सेंटरमुळे रोग निदानात जिल्हा अव्वल

डायग्नोस्टिक सेंटरमुळे रोग निदानात जिल्हा अव्वल

Next

सांगली : सांगली-मिरजेच्या आरोग्य सेवेला दीडशे वर्षांहून अधिकचा इतिहास आहे. मेडिकल हब म्हणूनही या शहरांची राज्यात ओळख आहे. त्यातही अचूक रोगनिदान करण्यात आजही जिल्हा अव्वल आहे. या जिल्ह्यातील डायग्नोस्टिक सेंटरची भूमिका महत्त्वाची ठरली आहे.

जिल्ह्यात ४५ डायग्नोस्टिक सेंटर आहेत. त्यापैकी सांगलीतच ११ सेंटर्स आहेत. तसे सांगली व मिरजेची आरोग्यसेवा मुंबई-पुण्याच्या बरोबरीने उच्च दर्जाची राहिली आहे. वैद्यकीय क्षेत्रातील सर्वच अत्याधुनिक तंत्रज्ञान सांगली-मिरजेत उपलब्ध असल्याने आसपासच्या जिल्ह्यांसह कर्नाटक, कोकणातूनही उपचारासाठी लोक येतात. यात सर्वात महत्त्वाचे ठरते ते रोगाचे वेळेवर आणि अचूक निदान करणे. आजही सांगली-मिरजेत अचूक रोगनिदान करण्याची ख्याती कायम आहे. त्यात डायग्नोस्टिक सेंटर्सनी मोलाची कामगिरी बजावली आहे.

जिल्ह्यातील डायग्नोस्टिक सेंटरमध्ये रक्ताच्या चाचणीपासून ते अगदी अलीकडेच आलेल्या कोरोनापर्यंतच्या सर्व चाचण्या केल्या जात आहेत. रेडिऑलॉजीमध्ये डिजिटल एक्स-रे, अत्याधुनिक सोनोग्राफी मशिनरी आहे. थ्री डी, फोर डी, सिटी स्कॅन, एमआरआय, पॅट स्कॅन, दुर्बिणीतून केल्या जाणार्‍या सोनोग्राफीपासून ते कर्करोगावरील अत्याधुनिक रेडिएशन देणार्‍यापर्यंतचे सर्व तंत्रज्ञान जिल्ह्यात उपलब्ध आहे.

पॅथाॅलॉजी लॅबमध्ये रक्ताच्या सर्व चाचण्या, बायोकेमिस्ट्री विश्लेषण, सेल काऊंटर, हार्मोन्सच्या सर्व प्रकारच्या चाचण्या केल्या जातात. शिवाय आता कोविडच्या अनुषंगाने सर्व चाचण्या केल्या जात आहेत. केवळ जेनेटिक आणि मोलेक्युलर स्टडी या दोनच चाचण्या जिल्ह्यात होत नाहीत. पण अशा रुग्णांचे प्रमाणही अगदी नगण्य आहे.

कोट

पुण्या-मुंबईत असणाऱ्या सर्व सुविधा जिल्ह्यात उपलब्ध आहेत. सांगली आणि मिरजेत तज्ज्ञ, कुशल डॉक्टर शिकून तयार होत आहेत. ऑनलाईन सेमिनार, लाईव्ह वर्कशॉप आणि टेलीमेडिसीनही सहज उपलब्ध आहे. सर्वप्रकारचे रोगनिदान जिल्ह्यात होत असल्याने परजिल्ह्यांसह परराज्यातील रुग्णांचा सांगली-मिरजेच्या वैद्यकीय क्षेत्रावर विश्वास वाढत चालला आहे.

- डॉ. प्रसाद चिटणीस, प्राची डायग्नोस्टिक सेंटर

Web Title: The district is leading in diagnosis due to the diagnostic center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.