कुटुंबेच्या कुटुंबे उध्वस्त; सावकारांकडून पिळवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2020 16:57 IST2020-03-05T16:54:43+5:302020-03-05T16:57:41+5:30
व्यावसायिक कारणासाठी त्यांनी नऊ सावकारांकडून ५० लाख रूपयांचे कर्ज घेतले. या कर्जापोटी त्यांनी दोन कोटीहून अधिक रकमेची परतफेड करूनही त्यांच्याकडे या सावकारांचा वसुलीसाठी तगादा सुरूच होता.

कुटुंबेच्या कुटुंबे उध्वस्त; सावकारांकडून पिळवणूक
शरद जाधव ।
सांगली : कमी वेळेत आणि सहजपणे कर्ज मिळण्याचा मार्ग म्हणून सावकारांकडे जाण्याची मानसिकता वाढली असून, जिल्ह्यात ६७० परवानाधारक सावकार आहेत. विनापरवाना सावकारी करणाऱ्यांची संख्या तर उपलब्धच नाही. अनेक कर्जदार सावकारांकडून होणारी पिळवणूक आणि हजारांसाठी लाखो रुपयांचे व्याज देऊन मेटाकुटीला आले आहेत.
वसुलीसाठी असणारी तगडी फौज त्यांच्या दहशतीमुळे जिल्ह्यातील सावकारी पाश अधिक घट्ट होत कुटुंबेच्या कुटुंबे उध्वस्त होत आहेत.जिल्ह्यात खासगी सावकारीची अनेक प्रकरणे समोर येत असली तरी, सध्या सर्वाधिक गाजत असलेले प्रकरण म्हणजे मिरज येथील तंतुवाद्य निर्माते संजय मिरजकर यांचे. व्यावसायिक कारणासाठी त्यांनी नऊ सावकारांकडून ५० लाख रूपयांचे कर्ज घेतले. या कर्जापोटी त्यांनी दोन कोटीहून अधिक रकमेची परतफेड करूनही त्यांच्याकडे या सावकारांचा वसुलीसाठी तगादा सुरूच होता.
या कालावधित मानसिक छळ झाल्याने ते बेपत्ता होते. याबाबत कुटुंबीयांनी पोलिसात दाद मागितल्यानंतर मिरजेतील हे सावकारीचे प्रकरण समोर आले आहे. सोमवारीच या प्रकरणातील सावकारांना दणका देत मोक्कांतर्गत कारवाई केली आहे.
याच आठवड्यात समडोळी येथीलही एका प्रकरणात फोटोग्राफीचा व्यवसाय असलेल्या वैभव साळुंखे यांनी नऊ सावकारांकडून १७ लाख ८५ हजार रूपये घेतले होते. त्यांना पाच ते दहा टक्क्यांनी ही रक्कम दिली होती. रक्कम परत करूनही त्यांच्याकडून १५ लाख ६५ हजार रूपयांसाठी तगादा सुरू होता. यात तीन सावकारांना गजाआड केले असले तरी, इतर अद्यापही पसारच आहेत. अशाप्रकारे जिल्हाभर सावकारांच्या दहशतीला, पिळवणुकीला वैतागलेले कर्जदार गावोगावी आहेत.