शिवाजी विद्यापीठाचा जिल्हास्तरीय युवा महोत्सव येत्या बुधवारी सांगलीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2021 05:09 PM2021-12-20T17:09:37+5:302021-12-20T17:10:37+5:30
महोत्सवाचे यजमानपद सांगलीवाडी येथील डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयाकडे आहे.
सांगली : शिवाजी विद्यापीठाचा ४१ वा आंतरमहाविद्यालयीन जिल्हास्तरीय युवा महोत्सव सांगलीत बुधवारी (दि. २२) आयोजित केला आहे. सांगली, सातारा व कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांचे एक हजारहून अधिक विद्यार्थी सहभागी होत आहेत. महोत्सवाचे यजमानपद सांगलीवाडी येथील डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयाकडे आहे. प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे, डॉ. बोराडे यांनी ही माहिती दिली.
ते म्हणाले, गेल्यावर्षी कोरोनास्थितीमुळे युवा महोत्सव ऑनलाईन झाला होता. यावर्षी कोरोनाचे नियम पाळत महाविद्यालयात महोत्सव होईल. सकाळी १० वाजता भारती विद्यापीठ शालेय समितीच्या अध्यक्षा विजयमाला कदम यांच्या अध्यक्षतेखाली व कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्या हस्ते उदघाटनाचा कार्यक्रम होईल. यावेळी प्र कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील, भारती विद्यापीठाचे विभागीय संचालक डॉ. एच. एम. कदम, संजय घोडावत विद्यापीठाचे विश्वस्त विनायक भोगले, शिवाजी विद्यापीठाच्या महाविद्यालय व विद्यापीठ विकास मंडळाचे माजी संचालक प्राचार्य डॉ. डी. आर. मोरे, आमदार सुधीर गाडगीळ, महापौर दिग्विजय सूर्यवंशी, विद्यापीठ अधिसभा सदस्य संदीप परमणे, विशाल गायकवाड आदी उपस्थित राहतील.
सकाळच्या सत्रात लोकसंगीत वाद्यवृंद, समूहगीत, नकला, वक्तृत्व, पथनाट्य स्पर्धा होतील. दुपारी एकांकिका, वादविवाद, लोककला, सुगम गायन, मूकनाट्य स्पर्धा होतील. सायंकाळी लोकनृत्य, लघु नाटीका स्पर्धा होतील. महाविद्यालय, भावे नाट्यगृह तसेच राणा प्रताप चौकात विविध कार्यक्रम होणार आहेत.