जिल्ह्याचे किमान तापमान १४ अंशावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 04:21 AM2020-12-25T04:21:42+5:302020-12-25T04:21:42+5:30
सांगली : जिल्ह्याचे सरासरी किमान तापमान गुरुवारी १४ अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरल्याने थंडीची तीव्रता वाढली आहे. येत्या आठवडाभरात तापमान ...
सांगली : जिल्ह्याचे सरासरी किमान तापमान गुरुवारी १४ अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरल्याने थंडीची तीव्रता वाढली आहे. येत्या आठवडाभरात तापमान १२ अंशापर्यंत खाली घसरण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तविला आहे.
जिल्ह्याचे सरासरी कमाल तापमान सध्या ३१ अंशावर स्थिर आहे. तरीही दिवसाही काही प्रमाणात थंडी जाणवत आहे. जिल्ह्याच्या डिसेंबरमधील सरासरी कमाल तापमानाजवळ हा पारा आहे तर किमान तापमान सरासरीपेक्षा २ अंशाने कमी आहे. त्यामुळे रात्रीची थंडी अधिक बोचरी होत आहे. हवामान खात्याने नोंदविलेल्या निरीक्षणानुसार तापमानात पुन्हा घट होऊन पारा १२ अंशापर्यंत खाली घसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे आठवड्यात कडाक्याच्या थंडीचा सामना करावा लागेल. जिल्ह्यात १० डिसेंबर १०७० मध्ये किमान तापमानाचा ६.५ अंश सेल्सिअसचा विक्रम नोंदला गेला आहे. आजतागायत तो कायम आहे. यंदा हा विक्रम मोडीत निघण्याची शक्यता कमी आहे.
वाढत्या थंडीमुळे जिल्ह्यात नागरिकांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत असून, सर्दी, ताप व खोकल्याचे रुग्ण वाढत आहेत. थंडीपासून बचावासाठी नागरिकांना ऊबदार कपड्यांचा आधार घ्यावा लागत आहे. ठिकठिकाणी शेकोट्या पेटविल्या जात आहेत.