जिल्ह्याला ४० टन ऑक्सिजनची गरज, मिळतो ३५ टन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:27 AM2021-05-06T04:27:52+5:302021-05-06T04:27:52+5:30
सांगली : कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे ऑक्सिजनच्या मागणीतही वाढ होत आहे. जिल्ह्यास रोज ३८ ते ४० टन ...
सांगली : कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे ऑक्सिजनच्या मागणीतही वाढ होत आहे. जिल्ह्यास रोज ३८ ते ४० टन ऑक्सिजनची गरज आहे. त्यापैकी जिल्ह्यात ३५ टनांपर्यंत ऑक्सिजन उपलब्ध होत असून, मागणीच्या तुलनेत पाच टनांची तफावत आहे. यामुळे शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांसह खासगी रुग्णालयांतील डॉक्टरांची ऑक्सिजनसाठी प्रचंड धावपळ सुरू आहे. जिल्हाधिकारी, लोकप्रतिनिधी यांचेही ऑक्सिजन उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न चालू आहेत.
जिल्ह्यात रोज दीड हजारावर कोरोना रुग्ण सापडत आहेत. सध्या उपचाराखालील कोरोना रुग्णांची संख्या चौदा हजार आहे. तसेच एकूण कोरोना रुग्णांची संख्या ८१ हजार ४८६ आहे. रोज मृत्यूंचा आकडाही पन्नासच्या वर आहे. या आकड्यावरून कोरोनाची स्थिती चिंताजनकच झाल्याचे दिसत आहे. कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या रुग्णांमध्ये ऑक्सिजन कमी होण्याचे प्रमाणही जास्त असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त नितीन भांडारकर यांच्या माहितीनुसार, जिल्ह्यात रोज ३८ ते ४० टन ऑक्सिजनची गरज आहे. पालकमंत्री जयंत पाटील, कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी आणि खासदार, आमदार यांच्यासह लोकप्रतिनिधी जिल्ह्यातील रुग्णांना ऑक्सिजन कमी पडू नये यासाठी प्रयत्न करीत आहेत. म्हणूनच सध्या ३० ते ३५ टनांपर्यंत ऑक्सिजन उपलब्ध होत आहे. तरीही जिल्ह्यातील कोरोना रुग्णांसाठी पाच टनांपर्यंत ऑक्सिजनची कमतरता आहे. ऑक्सिजन मिळविण्यासाठी खासगीसह शासकीय रुग्णालयांतील डॉक्टरांना प्रचंड कसरत करावी लागत आहे. उपलब्ध ऑक्सिजनचा काटकसरीने प्रत्येक रुग्णालय वापर करीत असल्याचेही प्रशासनाकडून सांगण्यात आले.
चौकट
दिवसात ३५ टन ऑक्सिजन मिळाला
जिल्ह्यासाठी बुधवारी सकाळी दहा टन आणि दुपारी १५ टन ऑक्सिजन मिळाला आहे. दहा टनांचा ऑक्सिजन टँकर सायंकाळी सांगलीत दाखल झाला आहे. असा एकत्रित कालच्या दिवसात ३५ टन ऑक्सिजन उपलब्ध झाला आहे. रोजच्या रोज ऑक्सिजन उपलब्ध होत आहे; पण मागणीही तेवढ्याच प्रमाणात वाढत असल्यामुळे काहीवेळी ऑक्सिजन पुरवठ्यात अडचणी येत आहेत, अशी माहिती अन्न व औषध प्रशासनचे सहायक आयुक्त नितीन भांडारकर यांनी दिली.