जि. प.च्या सीईओंकडून अधिकाऱ्याची खरडपट्टी

By admin | Published: June 24, 2015 12:14 AM2015-06-24T00:14:26+5:302015-06-24T00:43:46+5:30

स्थायी सभा : कारवाईचा इशारा

District Officer's reprimand from CEO | जि. प.च्या सीईओंकडून अधिकाऱ्याची खरडपट्टी

जि. प.च्या सीईओंकडून अधिकाऱ्याची खरडपट्टी

Next

सांगली : समाजकल्याण अधिकारी सचिन कवले यांना खोट्या तक्रारीद्वारे अडचणीत आणण्याचा प्रयत्न, तसेच पशुसंवर्धन व कृषी विभागातील अधिकाऱ्यांना वेठीस धरल्याप्रकरणी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पाटील यांच्याविषयी मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश लोखंडे यांनी मंगळवारी स्थायी समिती सभेत नाराजी व्यक्त केली. जिल्हा परिषदेची बदनामी होईल असे कृत्य कोणी केले, तर त्यांना घरचा रस्ता दाखविण्याचा इशाराही लोखंडे यांनी दिला.
जिल्हा परिषद समाजकल्याण विभागामध्ये समाजकल्याण अधिकारी सचिन कवले यांची सहा महिन्यांपूर्वीच नियुक्ती झाली आहे. त्यांची पहिलीच नियुक्ती असून, प्रामाणिक अधिकारी अशी त्यांची ओळख आहे. परंतु, समाजकल्याण विभागातील काही कर्मचारी कवले यांना न विचारताच अनेक फायली अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पाटील यांच्याकडे पाठवत आहेत. खातेप्रमुखांच्या आदेशाचे पालन केले जात नाही, म्हणून समाजकल्याण विभागातील लिपिक श्रीमती एस. के. डांगे यांना मुख्य कार्यकारी अधिकारी लोखंडे यांनी कारवाईची नोटीस बजाविली होती. त्यानंतर लोखंडे सहा दिवसांच्या रजेवर गेले. यादरम्यानच्या कालावधीचा पदभार अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पाटील यांच्याकडे दिला होता. यावेळी पाटील यांनी डांगे यांच्याकडून खुलासा घेऊन कारवाईची फाईल गुंडाळली होती. तसेच समाजकल्याण अधिकारी कवले यांच्याविरोधात खोट्या तक्रारी घेऊन त्यांना दिलीप पाटील यांनी नोटीस बजाविली होती.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या या प्रकाराबद्दल सचिन कवले यांनी सतीश लोखंडे यांच्याकडे तक्रार केली. याप्रमाणेच पशुसंवर्धन, कृषी विभागातही कारभार सुरू असून, जिल्हा परिषदेची बदनामी केली जात आहे, याबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी लोखंडे यांनी जिल्हा परिषद स्थायी समिती सभेत मंगळवारी खंत व्यक्त केली. अखेर लोखंडे यांनी, पदाधिकाऱ्यांनाही, तुम्ही मला यांच्यावर कारवाई नको, त्यांच्यावर नको, अशी विनवणी करू नका, अशी सूचना दिली. (प्रतिनिधी)

बदनामीबद्दल संताप
जिल्हा परिषदेची वारंवार बदनामी करून खातेप्रमुखांना कोण वेठीस धरत असेल, तर कुणालाही सोडणार नाही. संबंधित अधिकारी जबाबदारीचे भान सोडून वागणार असतील, तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा देऊन लोखंडे यांनी त्यांची चांगलीच खरडपट्टी केली.



पदाधिकाऱ्यांचा पाठिंबा
जिल्हा परिषदेतील बेशिस्त अधिकारी, कर्मचाऱ्यांना कडक कारवाई करून वठणीवर आणण्यासाठी जिल्हा परिषदेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी लोखंडे यांना अधिकार दिले आहेत. कुणावरही कारवाई केल्यास आम्ही विरोध करणार नाही, असे आश्वासनही पदाधिकाऱ्यांनी दिले आहे.

Web Title: District Officer's reprimand from CEO

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.