जि. प. देणार शिक्षकांना शिस्तीचे धडे
By admin | Published: July 28, 2016 12:12 AM2016-07-28T00:12:45+5:302016-07-28T00:56:42+5:30
शिक्षण समितीच्या बैठकीत निर्णय : सात शाळांमध्ये सेमी इंग्रजी वर्ग सुरू करण्यास मंजुरी
सांगली : जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनी दाढी केलेली असली पाहिजे, त्यांचा पोषाख नीटनेटका व सुस्थितीत असला पाहिजे. तसेच जिल्ह्यातील सर्व शिक्षकांसाठी एकच ड्रेस निश्चित करण्याचा निर्णय झाला. शाळेच्या परिसरात शिक्षकांनी गुटखा, मावा, तंबाखू सेवन करण्यावर बंदी घातली असून, तसे शिक्षक आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचा निर्णय जिल्हा परिषद शिक्षण समितीच्या बैठकीत घेण्यात आला. तसेच शिक्षकांनी कशापध्दतीने टापटीप राहिले पाहिजे, याविषयी शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना मार्गदर्शन करावे, असाही निर्णय घेण्यात आला.
उपाध्यक्ष रणजित पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जि. प. शिक्षण समितीची बैठक बुधवारी झाली. जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनी शिस्तबध्द राहिले पाहिजे. या शिक्षकांचेच विद्यार्थी अनुकरण करीत असतात. परंतु, अनेक शिक्षक दाढी कशीही ठेवतात. त्यांचे कपडे स्वच्छ नसल्याचेही दिसत आहे. काही शिक्षक गुटखा, मावा, तंबाखू खात असल्याचे दिसत आहे. या सर्वांचा लहान विद्यार्थ्यांच्या मनावर परिणाम होत आहे. यापुढे शिक्षकांनी शाळेमध्ये टापटीमध्येच आले पाहिजे. याबाबत शिक्षकांना अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन करावे, अशी सदस्यांनी मागणी केली होती. त्यानुसार शिक्षण समितीच्या बैठकीत तसा निर्णयही घेण्यात आला. तसेच जिल्ह्यातील सर्वच शिक्षकांसाठी ड्रेस कोड निश्चित करण्याचाही निर्णय झाला. चौदाव्या वित्त आयोगातून गावांसाठी निधी मिळाला आहे. या निधीपैकी २५ टक्के निधी ग्रामपंचायतींनी शिक्षण, आरोग्य विभागावर खर्च केला पाहिजे. या निधीतून शाळांनी संरक्षण भिंत आदी मूलभूत सुविधांसाठी तो निधी खर्च करण्यासाठी प्रयत्न करावेत.
जत तालुक्यातील जालीहाळ बुद्रुक, ओलेकर वस्ती-खिलारवाडी, जिवान्नावार-साळुंखे वस्ती, सिंगनहळी येथील जिल्हा परिषद शाळेतील पहिलीच्या वर्गामध्ये सेमी इंग्रजी वर्ग सुरु करण्यास मंजुरी देण्यात आली. (प्रतिनिधी)