जि. प. आरोग्य विभागाचाही कानाडोळा
By admin | Published: March 14, 2017 11:43 PM2017-03-14T23:43:58+5:302017-03-14T23:43:58+5:30
म्हैसाळ भ्रूणहत्या प्रकरण : गाफिल यंत्रणांच्या यादीत समावेश : आरोग्य अधिकाऱ्यांना अधिकाराचा विसर
सांगली : ग्रामीण भागामध्ये रुग्णालये सुरु करण्यापूर्वी बॉम्बे नर्सिंगहोम अॅक्टनुसार त्याची नोंदणी करणे बंधनकारक आहे. या अॅक्टनुसार नोंदणी नसेल तर, त्या डॉक्टरांवर कारवाई करण्याचे अधिकार जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना आहेत. या कायद्यानुसार डॉ. बाबासाहेब खिद्रापुरेवर वेळीच कारवाई झाली असती तर, अनेक कोवळ्या कळ्यांचे जीव वाचले असते. गाफिल शासकीय यंत्रणांच्या यादीत त्यामुळे जि. प. च्या आरोग्य विभागाचाही समावेश झाला आहे.
म्हैसाळ (ता. मिरज) येथील डॉ. खिद्रापुरे याने नर्सिंगहोमच्या नोंदणीसाठी २०१२ मध्ये जिल्हा परिषदेकडे अर्ज केला होता. तत्कालीन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभिमन्यू खरे यांनी तुमच्याकडे त्या संबंधीची वैद्यकीय पदवी नसल्यामुळे परवाना देता येत नसल्याचे सांगून प्रस्ताव फेटाळला होता. त्यानंतरही डॉ. खिद्रापुरे विनापरवाना, विनानोंदणी वैद्यकीय व्यवसाय करीत होता. म्हैसाळ येथील डॉ. खिद्रापुरे याच्या रुग्णालयात मणेराजुरी (ता. तासगाव) येथील स्वाती जमदाडे या विवाहितेचा अनैसर्गिक गर्भपात करताना मृत्यू झाला होता. त्यानंतर खिद्रापुरेचा काळा उद्योग उजेडात आला. भ्रूण हत्याकांडाचे हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर संपूर्ण राज्यभर खळबळ उडाली. गावातील ग्रामस्थांनीही निनावी पत्राद्वारे, जिल्हा प्रशासनाने डॉ. खिद्रापुरेच्या अवैद्य वैद्यकीय व्यवसायाबद्दल तक्रारी केल्या होत्या. तरीही याकडे जाणीवपूर्वक प्रशासनाने डोळेझाक केली. दुसऱ्या बाजूला म्हैसाळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रापासून दोन फूट अंतरावर डॉ. खिद्रापुरेचे रुग्णालय आहे. डॉ. खिद्रापुरेचा अनैसर्गिक गर्भपात करून कोट्यवधीची माया जमविण्याचा उद्योग सुरु होता. याकडे तेथील आरोग्य विभागाचे दुर्लक्ष का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे ग्रामीण भागातील रुग्णालये सुरु करण्यापूर्वी बॉम्बे नर्सिंग होम अॅक्टनुसार त्याची नोंदणी करण्याचे अधिकार आहेत. त्याचप्रमाणे बॉम्बे नर्सिंग होम रजिस्ट्रेशन सुधारित अॅक्ट २००५ कलम तीननुसार रुग्णालयाची नोंदणी नसेल तर त्या डॉक्टरवर कारवाईचेही अधिकार जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रापासून दोनशे फूट अंतरावर डॉ. खिद्रापुरेचा अवैद्य वैद्यकीय व्यवसाय जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यापर्यंत कसा पोहोचला नाही, असाही प्रश्न उपस्थित होत आहे. (प्रतिनिधी)
खिद्रापुरेच्या रुग्णालयावर कारवाईचा आम्हाला अधिकार नाही : राम हंकारे
म्हैसाळ येथील डॉ. खिद्रापुरेच्या रुग्णालयावर कारवाईचा आम्हाला अधिकार नाही. केवळ रुग्णालय चालू करताना आमची परवानगी घेण्याची गरज आहे. त्यानुसार खिद्रापुरेकडे नर्सिंग होमसाठीची वैद्यकीय पदवी नसल्याने त्यांचा परवाना घेण्यासाठीचा २०१२ रोजी प्रस्ताव पाठविला होता. तत्कालीन जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी त्यांना परवानगी दिली नाही. त्यानंतर तो अनधिकृत वैद्यकीय व्यवसाय करीत असल्याचे आम्हाला आताच कळले आहे. जिल्हा परिषद आरोग्य कर्मचाऱ्यांना रुग्णालयाची तपासणी करण्याचा अधिकार नाही. तसेच त्यांच्यावर कारवाईचाही अधिकार नाही, अशी माहिती जिल्हा परिषद जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राम हंकारे यांनी दिली.
चार वर्षे खिद्रापुरेला मोकाट का सोडले?.
म्हैसाळ गाव हे मिरजेपासून दहा किलोमीटर अंतरावर आहे. एवढ्या जवळचा गैरकारभार दिसत नसेल तर जत आणि शिराळा तालुक्यातील दुर्गम भागातील बोगस डॉक्टर, अनधिकृत नर्सिंग होम चालविणाऱ्यांची नावे शासकीय यंत्रणेला कशी कळणार, असाही प्रश्न जनतेतून उपस्थित होत आहे. शासकीय यंत्रणेने डॉ. खिद्रापुरेवर कारवाईसाठी वैद्यकीय नियमातील त्रुटीचा वापर केला. आरोग्य विभागाच्या प्रत्येक अधिकाऱ्यांनी सोयीनुसार जबाबदारी झटकली आहे. म्हणूनच खिद्रापुरेने आरोग्य केंद्रापासूनच दोनशे फुटांवर खुलेआम भ्रूणांचा कत्तलखाना सुरु केला होता.
आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांच्या भेटीच नाहीत : अशोक वडकर
म्हैसाळ येथील डॉ. खिद्रापुरेचे रुग्णालय प्राथमिक आरोग्य केंद्रापासून दोनशे फुटावर आहे. येथील डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेला कळविले नाही. दुसरी गोष्ट वर्षातून एक तरी भेट जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी आरोग्य केंद्रास दिली असती तर डॉ. खिद्रापुरेचा गैरकारभार उजेडात आला असता, रुग्णालयाला परवाना देण्याबरोबर परवाना नसताना ते रुग्णालय चालवत आहे, त्यावरही त्यांनी कारवाई केली पाहिजे. परंतु, त्याकडे जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले आहे, अशी टीका म्हैसाळ येथील रुग्णकल्याण समितीचे सदस्य अशोक वडकर यांनी केली आहे.