जि. प. अध्यक्ष पदावरून राष्ट्रवादीत संघर्ष

By admin | Published: April 20, 2016 11:43 PM2016-04-20T23:43:33+5:302016-04-20T23:43:33+5:30

योजना शिंदे, कल्पना सावंत यांच्यात रस्सीखेच : काँग्रेसकडूनही निवडणूक लढविण्याची तयारी

District Par. Nationalist struggle in the post of president | जि. प. अध्यक्ष पदावरून राष्ट्रवादीत संघर्ष

जि. प. अध्यक्ष पदावरून राष्ट्रवादीत संघर्ष

Next

अशोक डोंबाळे ल्ल सांगली
जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदासाठी तासगाव तालुक्यातील योजना शिंदे (मणेराजुरी) आणि कल्पना सावंत (सावळज) यांच्यात रस्सीखेच असून, पक्षातील संघर्ष पेटला आहे. आर. आर. पाटील समर्थकांकडून सध्या शिंदे यांचे नाव आघाडीवर असले तरी त्यांना भाजपने तीव्र विरोध करत काँग्रेसला सहकार्याची भूमिका घेतली आहे. दुसऱ्या बाजूला सावंत यांच्या नावाला खुद्द राष्ट्रवादीतूनच विरोध आहे. या वादात स्नेहल पाटील (येळावी) यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीतील नाराजांच्या मदतीने निवडणूक लढविण्यासाठी काँग्रेसच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष आणि चार समिती सभापती निवडीत खानापूर-आटपाडीचे शिवसेनेचे आमदार अनिल बाबर गटाच्या सदस्यांना डावलले आहे. कवठेमहांकाळमधील माजी मंत्री अजितराव घोरपडे समर्थक तानाजी यमगर यांचा तर शेवटच्याक्षणी पत्ता कट झाल्यामुळे तेही नाराज आहेत. अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत या नाराजांची मोट बांधण्याचे आव्हान राष्ट्रवादीच्या नेत्यांसमोर आहे. त्यामुळे विद्यमान अध्यक्षा रेश्माक्का होर्तीकर यांचा राजीनामा लांबणीवर पडत आहे.
अध्यक्षपद तासगाव तालुक्यास देण्याचे निश्चित झाले आहे. परंतु, तासगाव तालुक्यातील कल्पना सावंत, योजना शिंदे आणि स्नेहल पाटील या तिघींपैकी एकही सदस्य मागे सरण्यास तयार नाही. प्रत्येकीने अध्यक्ष पदावर दावा सांगितला आहे. याबाबत आर. आर. पाटील गटाने निर्णय घ्यायचा असून, त्यांच्याकडून शिंदे यांचे नावाला पसंती देण्यात आली आहे. मात्र यांच्या नावाला खासदार संजयकाका पाटील समर्थक सदस्यांनी तीव्र विरोध केला आहे. दुसरीकडे कल्पना सावंत यांच्या नावाला आर. आर. पाटील गटाचे समर्थन नाही. परिणामी राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री जयंत पाटील, जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे यांची पंचाीत झाली आहे. शिंदे व सावंत यांच्यातील वादामुळे स्नेहल पाटील यांचे अध्यक्षपदासाठी नाव पुढे येऊ शकते.
शिंदे, सावंत यांच्या नावावरून सध्या राष्ट्रवादीतच कलगीतुरा रंगल्यामुळे काँग्रेसने अध्यक्ष पदाची निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्याकडे स्वाभिमानी आघाडीसह २६ सदस्यांचे संख्याबळ आहे.
बहुमतासाठी त्यांना सहा सदस्यांची गरज असून, राष्ट्रवादीतील नाराज असलेल्या सदस्यांच्या जोरावर ते साध्य होऊ शकते. तथापि यासाठी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम, माजी मंत्री आ. डॉ. पतंगराव कदम यांच्या होकाराची गरज आहे. अध्यक्ष पदाच्या लढतीसाठी शर्मिला लाड (कुंडल) आणि मीनाक्षी महाडिक ही दोन नावे काँग्रेस पक्षाने निश्चित केली आहेत.
अध्यक्ष दोन दिवसात राजीनामा देणार
जिल्हा परिषद अध्यक्षांचा राजीनामा घेण्याबाबत राष्ट्रवादीच्या नेत्यांशी चर्चा झाली आहे. दोन दिवसात रेश्माक्का होर्तीकर राजीनामा देतील. त्यानंतर पुढील अध्यक्ष निवडीच्यादृष्टीने नेत्यांची पुन्हा बैठक होणार आहे. तासगाव तालुक्याला अध्यक्षपद देण्याचे निश्चित झाले आहे. तेथे तीन सदस्या इच्छुक असून, त्यापैकी कुणाला संधी द्यायची, ते निश्चित होईल, असे राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे यांनी सांगितले.
येळावी गटातून नेहमीच माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांना बहुमत दिले आहे. पक्षाशी एकनिष्ठ असून, अध्यक्ष पदाच्या माध्यमातून तासगाव तालुक्याच्या विकास कामामध्ये भर घालता येईल. त्यामुळे माझा अध्यक्ष पदावर दावा आहे. पक्षाच्या नेत्यांकडेही मागणी केली असून, त्यांनीही न्याय द्यावा.
- स्नेहल पाटील, सदस्या, येळावी

सावळज मतदारसंघ आर. आर. पाटील गटाचा बालेकिल्ला आहे. बऱ्याच दिवसांपासून या परिसराला पदाची संधी मिळाली नाही. शिवाय पक्षाशी एकनिष्ठ राहूनच काम केले आहे. त्यामुळे अध्यक्ष पदावर माझा दावा आहे. पक्षाच्या नेत्यांनी शब्द दिला असून, ते तो निश्चित पाळतील, याचा मला विश्वास आहे.
- कल्पना सावंत, सदस्या, सावळज
 

मी अपक्ष निवडून आले असले तरी, राष्ट्रवादीची सहयोगी सदस्या आहे. पक्षाच्या कार्यक्रमात अग्रेसर राहून काम केले आहे. राष्ट्रवादी पक्ष वाढीसाठी माझ्या कुटुंबाने वाहून घेतले होते. विधानसभा निवडणुकांमध्ये या मतदारसंघातून मताधिक्य दिले आहे. यामुळे निश्चितच पक्ष मला न्याय देईल.
- योजना शिंदे, सदस्या, मणेराजुरी

Web Title: District Par. Nationalist struggle in the post of president

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.