जि. प. समित्या निवडीत ‘भाऊसाहेब’च पडले भारी
By admin | Published: May 1, 2016 12:25 AM2016-05-01T00:25:51+5:302016-05-01T00:26:33+5:30
समित्यांच्या निवडी बिनविरोध : सावंत यांच्याकडे कृषी व पशुसंवर्धन
सांगली : जिल्हा परिषद बांधकाम व आरोग्य समितीवर अनेकांचा डोळा होता. परंतु, अखेरच्या क्षणी सभापती भाऊसाहेब पाटील यांनी दोन्ही समित्या मिळविण्यात यश मिळविल्यामुळे जिल्हा परिषदेत सगळीकडे ‘भाऊसाहेब’च भारी पडले, अशी चर्चा होती. बांधकाम समितीवर डोळा ठेवून बसलेले सभापती संजीवकुमार सावंत यांच्याकडे शेवटी कृषी व पशुसंवर्धन समिती राहिली आहे. उपाध्यक्ष रणजित पाटील यांना अर्थ व शिक्षण समित्या मिळाल्यामुळे ते समाधानी आहेत. या पदाधिकाऱ्यांचा अध्यक्षा रेश्माक्का होर्तीकर यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
उपाध्यक्ष रणजित पाटील, सभापती भाऊसाहेब पाटील आणि संजीवकुमार सावंत यांच्यामध्ये बांधकाम समिती मिळविण्यासाठी धडपड सुरू होती. नेत्यांकडून दबाव टाकून समित्या फोडण्याचाही प्रयत्न झाला. परंतु, सध्याच्या समित्यांमध्ये फोडाफोड केल्यास सहा समित्या वाटपाचा गोंधळ निर्माण होणार, हे नेत्यांनाही माहीत होते. त्यामुळे पूर्वीप्रमाणेच समित्या ठेवण्याचे निश्चित झाले. माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील (आबा) समर्थक भाऊसाहेब पाटील यांनी पूर्वीप्रमाणे बांधकाम व आरोग्य समिती मला मिळाली पाहिजे, असा दावा केला होता. त्यानुसार त्यांनी समित्या वाटपापूर्वीच बांधकाम व आरोग्य समिती सभापतींच्या दालनाचा ताबा घेतला होता. अखेर विषय समित्या वाटपासाठी शनिवारी जिल्हा परिषदेची विशेष सर्वसाधारण सभा बोलाविली होती. या सभेच्या अध्यक्षस्थानी रेश्माक्का होर्तीकर होत्या. यावेळी समित्यांचे वाटप करताना अध्यक्षा होर्तीकर यांनी बांधकाम व आरोग्य या दोन समित्या सभापती भाऊसाहेब पाटील यांच्याकडे देण्यात येत असल्याचे जाहीर केले. यावेळी संजीवकुमार सावंत यांच्या चेहऱ्यावर मात्र नाराजी दिसत होती. उपाध्यक्ष रणजित पाटील यांनी मात्र मला अर्थ समिती आणि अन्य कोणतीही समिती दिल्यास काही हरकत नसल्याचे सांगितले. यामुळे त्यांना अर्थ आणि शिक्षण समिती देण्यात आली. सावंत यांच्याकडे कृषी व पशुसंवर्धन समिती देण्यात आली. सर्व सभापतींनी समितीचा कारभार लगेच सुरूही केला.