जि. प. पेपरफुटीतील चौघेजण निलंबित
By admin | Published: January 19, 2016 10:52 PM2016-01-19T22:52:10+5:302016-01-19T23:44:15+5:30
सीईओंची कारवाई : खातेनिहाय चौकशी
सांगली : जिल्हा परिषदेच्या आरोग्य सेविका आणि औषध निर्माण अधिकारी पदाचे पेपर फोडण्यात सहभागी आढळून आल्याबद्दल जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी मंगळवारी बांधकाम विभागातील लिपिकासह आरोग्य विभागातील तीन आरोग्य सेवकांना निलंबित केले. या सर्व कर्मचाऱ्यांची खातेनिहाय चौकशी करण्यात येणार असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
जिल्हा परिषदेकडील रिक्त पदांसाठी दोन महिन्यांपूर्वी लेखी परीक्षा झाली होती. पहिल्यादिवशी औषध निर्माण अधिकारी, आरोग्य सेवक (महिला) या पदांसाठी परीक्षा होती़ शाहीन अजमुद्दीन जमादार या उमेदवाराने प्रश्नपत्रिका हातात पडण्यापूर्वीच उत्तरे लिहिण्यास सुरुवात केली़ या प्रकरणानंतर आरोग्य सेविका परीक्षेचा पेपर फुटल्याचे प्रकरण उजेडात आले. या चौकशीत जि. प. मुद्रणालयातील बायंडर रामदास फुलारे याने पेपर फोडल्याची धक्कादायक माहिती पुढे आली. अधिक चौकशीमध्ये फुलारे याने औषध निर्माण अधिकारी पदाचाही पेपर फोडल्याची कबुली दिली. पोलिसांच्या चौकशीमध्ये आणखी चौघे दोषी आढळून आले आहेत. यामध्ये जिल्हा परिषद बांधकाम विभागातील कनिष्ठ सहायक किरण वसंतराव जाधव, कवलापूर प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सेवक संजय गणपती कांबळे, भोसे आरोग्य केंद्रातील आरोग्य सेवक मंदार कोरे आणि आरोग्य सहायक शीतल मोगलखोडे या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. पोलिसांच्या अहवालानुसार या चौघांवर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी निलंबनाची कारवाई केली आहे. (प्रतिनिधी)