जिल्ह्यात गतवर्षीपेक्षा ७७.३ टक्के जादा पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2019 11:47 PM2019-09-07T23:47:22+5:302019-09-07T23:47:26+5:30
सांगली : जिल्ह्यात मान्सूनची हजेरी उशिरा लागली असली तरी, दि. ७ सप्टेंबर २०१८ च्या तुलनेत ७ सप्टेंबर २०१९ मध्ये ...
सांगली : जिल्ह्यात मान्सूनची हजेरी उशिरा लागली असली तरी, दि. ७ सप्टेंबर २०१८ च्या तुलनेत ७ सप्टेंबर २०१९ मध्ये ७७.३ टक्के जादा पाऊस झाला आहे. वाळवा, कवठेमहांकाळ, पलूस, आटपाडी, तासगाव तालुक्यात तर दुपटीने पाऊस झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
सप्टेंबर २०१८ मध्ये जिल्ह्यात सरासरी ३२९.८ मिलिमीटर पाऊस झाला. जत, आटपाडी, कवठेमहांकाळ, तासगाव तालुक्यात दोनशे मिलिमीटरपेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे तिथे तीन लाख नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची प्रतीक्षा करावी लागत होती; तर पशुधनासाठी शासनाला चारा छावण्या सुरू केल्या होत्या. यावर्षी म्हणजे २०१९ मध्ये गतवर्षीपेक्षा आणखी बिकट परिस्थिती निर्माण होईल, असेच जिल्ह्यात चित्र होते. जुलैअखेरपर्यंत जिल्ह्यात मान्सून दाखल झाला नव्हता. यामुळे शेतकऱ्यांसह जिल्हा प्रशासनही चिंतेत होते. तोपर्यंत दि. २४ जुलैपासून राज्यभर संततधार पावसाने हजेरी लावली. आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यात महापुरामुळे सर्वत्र हाहाकार झाला होता. दि. ७ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात सरासरी ५७८.४ मिलिमीटर पाऊस झाला असून, गतवर्षीच्या तुलनेत २४८.६ मिलिमीटर जादा पाऊस झाला. टक्केवारीचा विचार केल्यास, ७७.३ टक्के जादा पाऊस झाला आहे.
दुष्काळी भागात जोराचा नसला तरी, रिमझिम पावसाने हजेरी लावल्यामुळे खरिपाची पिके शेतकºयांच्या कशी तरी पदरात पडतील, अशीच परिस्थिती आहे. मिरज तालुक्यात ५९.७ टक्के, जत ४८ टक्के, खानापूर ४१.९ टक्के, वाळवा १०८.१, तासगाव १००.६, शिराळा ४१.६, आटपाडी १११.७, कवठेमहांकाळ ८५.४, पलूस ९० आणि कडेगाव तालुक्यात ८९.५ टक्के जादा पाऊस यावर्षी जादा झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
जिल्ह्यातील पाऊस (मिलिमीटर)
तालुका २०१९ २०१८
मिरज ५११.२ ३२४.७
जत २६४.५ १४४.६
खानापूर ३०१.४ २६२.६
वाळवा ७५८.४ ३३६.७
तासगाव ४४६.७ १४९.८
शिराळा १४४३ ११५४.६
आटपाडी २४१.१ ५३.७
कवठेमहांकाळ ३६७.१ १६२.४
पलूस ५०९.२ २४२
कडेगाव ५५५.६ ३१४.६
एकूण ५७८.४ ३२९.८