जि. प.च्या मनमानीने शाळा अडचणीत
By admin | Published: August 8, 2016 11:05 PM2016-08-08T23:05:15+5:302016-08-08T23:39:42+5:30
स्वाती लांडगे : शाळांऐवजी शिक्षकांच्या सोयीने नियुक्तीचे धोरण नुकसानीचे
तासगाव : तासगाव तालुक्यातील तब्बल १६ शाळांत अपुरे शिक्षक असल्यामुळे शाळांसह विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. तालुक्यातील ४७ शाळांत जागा रिक्त असून, पंचायत समितीकडून १६ शाळांत तातडीने शिक्षकांची गरज होती. तशी जिल्हा परिषदेकडे मागणी केली आहे. जिल्हा परिषद स्तरावरून शाळांची सोय पाहण्याऐवजी शिक्षकांची सोय पाहून थेट शाळेत नेमणुका दिल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या मनमानीनेच तालुक्यातील शाळा अडचणीत आल्याचा आरोप पंचायत समितीच्या सभापती स्वाती लांडगे यांनी केला.
त्या पुढे म्हणाल्या, तासगाव तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांची गुणवत्तापूर्ण कामगिरी आहे. त्यामुळेच गेल्या काही वर्षांत शाळेत पटसंख्या वाढत आहे. मात्र यावेळी झालेल्या प्रशासकीय आणि विनंती बदली प्रक्रियेत अनेक शाळांत शिक्षकांचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्हा परिषदेतून नियुक्ती दिलेले सहा शिक्षक अद्याप हजर झालेले नाहीत, तर बदली होऊन अन्य तालुक्यातून आणि परजिल्ह्यातून आलेल्या शिक्षकांची जिल्हा परिषदेकडून थेट शाळेवर नियुक्ती करण्यात आली आहे.
तालुक्यातील ४७ शाळांत ५५ शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. त्यापैकी १६ शाळांत शिक्षकांची प्राधान्याने गरज आहे. या बहुतांश शाळांचा डोलारा एकाच शिक्षकावर अवलंबून आहे. त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होत आहे. त्यामुळे प्राधान्याने शिक्षकांची आवश्यकता असलेल्या शाळांची यादी जिल्हा परिषदेला सादर करण्यात आली होती. मात्र जिल्हा परिषदेकडून, विशेषत: शिक्षण समिती आणि शिक्षणाधिकाऱ्यांकडून शिक्षकांच्या नेमणुकीचे धोरण चुकीच्या पध्दतीने राबविले आहे. जिल्हा परिषदेतून कोणत्या शाळेवर शिक्षक द्यायचा, याचा निर्णय घेतला जातो. अशा पध्दतीने नियुक्ती देताना शाळेची गरज पाहण्याऐवजी शिक्षकाची सोय पाहिली जात आहे. शिक्षकांची नियुक्ती पंचायत समितीमार्फत झाली असती, तर या शाळांचा प्रश्न निर्माण झाला नसता, अशी टीका लांडगे यांनी केली. (वार्ताहर)
...तर विद्यार्थ्यांसह : झेडपीत ठिय्या
तालुक्यातील प्राधान्याने गरज असलेल्या शाळांना शिक्षक मिळावा, यासाठी पालक आणि गावातील लोकप्रतिनधींकडून पंचायत समितीकडे सातत्याने मागणी केली जात आहे. लोकांच्या आमच्याकडून अपेक्षा आहेत. मात्र जिल्हा परिषदेच्या धोरणांमुळे आमचे पंचायत समितीचे काम पोस्टमनप्रमाणे झाले आहे. येत्या आठ दिवसांत तातडीच्या शाळांतून शिक्षकांची नेमणूक केली नाही, तर संबंधित शाळांतील विद्यार्थी आणि पालकांना घेऊन जिल्हा परिषदेसमोरच ठिय्या मारणार असल्याचा इशाराही यावेळी सभापती लांडगे यांनी दिला.