जिल्हा विशेष लेेखापरीक्षकाला लाखाची लाच घेताना पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:24 AM2021-03-19T04:24:48+5:302021-03-19T04:24:48+5:30
सांगली : चार्टर्ड अकाैंटन्सी फर्मचे नाव पॅनलमधून न काढण्याच्या मोबदल्यात एक लाख पाच हजारांची लाच स्वीकारताना जिल्हा विशेष लेखापरीक्षकाला ...
सांगली : चार्टर्ड अकाैंटन्सी फर्मचे नाव पॅनलमधून न काढण्याच्या मोबदल्यात एक लाख पाच हजारांची लाच स्वीकारताना जिल्हा विशेष लेखापरीक्षकाला रंगेहात पकडण्यात आले. रवींद्र बाळकृष्ण वाघ (वय ५२, रा. सांगली) असे अधिकाऱ्याचे नाव असून, मध्यवर्ती शासकीय इमारतीमधील कार्यालयात गुरुवारी सकाळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा लावून ही कारवाई केली.
तक्रारदार चार्टर्ड अकाैंटन्सीच्या फर्मचे भागीदार आहेत. तक्रारदारांनी एका संस्थेचे लेखापरीक्षण केले असून, त्याचे लेखापरीक्षण शुल्क १० लाख ५० हजार रुपये आहे. त्या संस्थेच्या लेखापरीक्षणाचा अहवाल सहकारी संस्थेच्या जिल्हा विशेष लेखापरीक्षकांकडे ३१ जानेवारी २०२१ पूर्वी जाणे आवश्यक होते. मात्र, कोरोनाच्या परिस्थितीमुळे फर्मकडून लेखापरीक्षण अहवाल वेळेत सादर झाला नाही. त्यामुळे जिल्हा विशेष लेखापरीक्षक रवींद्र वाघ याने फर्मचे नाव तालिकेतून न काढण्यासाठी लेखापरीक्षण शुल्क दहा लाख ५० हजार रुपयांच्या १० टक्के, म्हणजेच एक लाख पाच हजार रुपये लाच म्हणून मागितले होते. त्यानंतर तक्रारदारांनी सोमवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. त्यानुसार विभागाने पडताळणी केली असता, वाघ याने लाचेची मागणी करून ती रक्कम गुरुवारी आणून देण्यास सांगितल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर गुरुवारी कार्यालयातच लाचेची रक्कम स्वीकारताना वाघ याला रंगेहात पकडण्यात आले.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक संजय घाटगे, पोलीस निरीक्षक गुरुदत्त मोरे, प्रशांत चौगुले, अविनाश सागर, संजय संकपाळ, सलीम मकानदार, सीमा माने यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.
चौकट
वाघ याच्याकडे अतिरिक्त कार्यभार
तब्बल एक लाखाची लाच घेताना रंगेहात पकडलेल्या वाघ याच्याकडे जिल्हा विशेष लेखापरीक्षक सहकारी संस्था पदाचा अतिरिक्त कार्यभार आहे. त्याच्याकडे दुग्ध संस्था विभागाचे नियमित कामकाज आहे. अतिरिक्त कार्यभार असतानाही त्याने इतक्या मोठ्या रकमेची लाच स्वीकारल्याचे चौकशीत स्पष्ट झाले.