‘कुसुमताई’च्या नेहा शिंदेला जिल्हा क्रीडा पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:24 AM2021-03-28T04:24:42+5:302021-03-28T04:24:42+5:30
फोटो- कुसुमताई कन्या महाविद्यालयाच्या नेहा शिंदे हिला वसंतदादा क्रीडा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी प्राजक्ता कोरे, माणिक वाघमारे, प्रशांत ...
फोटो- कुसुमताई कन्या महाविद्यालयाच्या नेहा शिंदे हिला वसंतदादा क्रीडा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी प्राजक्ता कोरे, माणिक वाघमारे, प्रशांत पवार, जमीर अत्तार उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : वेगवान सर्व्हिस आणि नेत्रदीपक खेळामुळे अल्पावधीतच व्हॉलीबॉल खेळात आपला दबदबा निर्माण करणाऱ्या येथील श्रीमती कुसुमताई राजारामबापू पाटील कन्या महाविद्यालयाची राष्ट्रीय खेळाडू नेहा हेमंत शिंदे हिला जिल्हा परिषदेच्या वतीने देण्यात येणारा ‘वसंतदादा पाटील जिल्हा क्रीडा पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
नेहा शिंदे हिची व्हॉलीबॉल खेळातील सर्वोत्कृष्ट कामगिरी लक्षात घेऊन सन २०१९-२०२० या वर्षासाठी तिला हा पुरस्कार देण्यात आला. या वर्षात तिने शिवाजी विद्यापीठाच्या संघाचे नेतृत्व केले. तसेच राज्य संघातून देखील राष्ट्रीय स्पर्धेमध्ये महाराष्ट्राचे अनेकदा प्रतिनिधित्व केले आहे.
जिल्हा परिषद सभागृहात झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात जिल्हा परिषद अध्यक्ष प्राजक्ता कोरे, जिल्हा क्रीडा अधिकारी माणिक वाघमारे, क्रीडा अधिकारी प्रशांत पवार, जमीर आत्तार, सर्व जिल्हा परिषद सदस्य व मान्यवर यांच्या हस्ते तिला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
नेहा शिंदे हिला शारीरिक शिक्षण संचालक प्रा. शरद पाटील, प्रा. भीमराव जाधव, सुहास जगताप यांचे मार्गदर्शन लाभले. तिच्या या यशाबद्दल पालकमंत्री जयंत पाटील, जिल्हा व्हॉलीबॉल संघटनेचे अध्यक्ष प्रतीक पाटील, कासेगाव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शामराव पाटील, सचिव प्राचार्य आर. डी. सावंत, सहसचिव प्राचार्य डॉ. राजेंद्र कुरळपकर यांनी तिचे अभिनंदन केले आहे.