जिल्ह्यात दुबार खरीप पेरणीचे संकट कायम
By admin | Published: July 9, 2015 11:41 PM2015-07-09T23:41:37+5:302015-07-09T23:41:37+5:30
दमदार पावसाची प्रतीक्षा : कवठेमहांकाळ, मिरज पूर्व भागात पिके कोमेजू लागली; शेतकरी चिंतेत
सोनी : मिरज तालुक्यातील सोनीसह परिसरातील पिके पावसाअभावी वाळू लागली असून, गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने पाठ फिरवल्याने शेतकरी वर्ग संकटात सापडला आहे. दुबार पेरणीच्या संकटाबरोबरच हंगामही वाया जाण्याची भीती व्यक्त होत आहे. पेरणी केलेल्या पिकांना ज्या शेतकऱ्यांकडे पिकांना पाणी देण्याची सोय आहे, ते पाणी पाजत आहेत. पण सर्वसामान्य गरीब शेतकऱ्यांना मोठ्याप्रमाणात फटका बसत आहे. गावातील व्यवहारही मंदावले आहेत. सोनीसह परिसरातील भोसे, पाटगाव, करोली (एम) परिसरात जूनच्या मध्यंतरी दमदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी ९० टक्के पेरणी पूर्ण केली आहे. पेरणीच्या काळात पावसाने हजेरी लावल्याने गेल्या दोन वर्षांपासून खरीप हंगामापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांनी यावर्षी दमदार पिकाची आशा व्यक्त केली होती. पण पेरणीनंतर पावसाने पाठ फिरवली आहे. शेतातील पिके आता पाण्याअभावी करपू लागली आहेत. ज्या शेतकऱ्यांकडे विहीर, कूपनलिका आहेत, ते पिके जगविण्याचा प्रयत्न करीत आहेत. पावसाच्या अभावामुळे गावातील व्यवहारावरही परिणाम झाला असून व्यवहार मंदावल्याचे व्यापारी सांगत आहेत. पावसाने दोन दिवसात हजेरी लावली तरच पिकांना जीवदान मिळण्याची आशा आहे. अन्यथा शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट उभे राहणार आहे.
देशिंग : कवठेमहांकाळ तालुक्यातील देशिंग परिसरासह बनेवाडी, मोरगाव, हरोली, अलकूड येथील शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. दरम्यान, मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर पेरण्या केल्या. पण पुन्हा पावसाने दडी मारल्याने जमिनीतून वर आलेले पिकांचे कोंब वाळू लागले आहेत.
देशिंग परिसरात ७० टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. परंतु वरुणराजाने सतत हुलकावणी देण्यास सुरुवात केल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट कोसळले आहे. येथील शेतकऱ्यांनी ज्वारी, भुईमूग, सोयाबीन, विविध प्रकारची कडधान्ये आदी पिकांची पेरणी केली आहे. सध्या म्हैसाळ योजनेचे पाणीही बंद असल्याने पिकांना पाणी देण्याचा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. इथली बऱ्यापैकी शेती पावसावर अवलंबून आहे, तर देशिंग परिसरात द्राक्ष व ऊसशेती मोठ्या प्रमाणावर असल्याने, या शेतीला पाणी द्यायचे, की खरीप हंगामातील पिकांना पाणी द्यायचे, अशा दुहेरी संकटात शेतकरी सापडले आहेत. त्यामुळे शेतकरी अजूनही मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.
येळापूर : जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस पडणाऱ्या शिराळा तालुक्यात गेल्या १५ दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे हाता-तोंडाशी आलेली खरीप हंगामातील पिके वाया जाणार असल्याने शेतकरी वर्गातून चिंता व्यक्त होत आहे. दोन दिवसात पावसाने सुरुवात केली नाही, तर शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट येणार आहे.
तालुक्यात खरीप हंगामातील जवळपास ९0 टक्के पेरण्या झाल्या असून या हंगामामध्ये धूळवाफेने पेरलेल्या भाताबरोबरच मका, भुईमूग, सोयाबीन, हायब्रीड आदी पिकांच्या पेरण्या करण्यात आल्या आहेत. तालुक्यातील बहुतांशी जमीन डोंगरउतारावर असून पाण्याचा निचरा मोठ्या प्रमाणात होतो. तसेच खडकाळ माळरानाची जमीन असल्यामुळे शेतात पाणी टिकून राहत नाही. त्यामुळे उंचावरील असणाऱ्या पिकांना पाणी कमी प्रमाणात मिळत असते. सध्या खरीप हंगामातील सर्व पिकांची चांगल्या पध्दतीने उगवण झाली आहे. मात्र पावसाने मोठी उघडीप दिल्याने पिके सुकू लागली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना पुन्हा पेरणी करावी लागणार का? पुन्हा पेरणी केली, तर त्याची योग्य प्रमाणात उगवण होणार का? असाही प्रश्न आहे. पावसाच्या लहरीपणाचा चांगलाच फटका शेतकऱ्यांना बसला आहे. (वार्ताहर)
कवठेमहांकाळ घाटमाथ्यावर चिंतेचे ढग
घाटनांद्रे : कवठेमहांकाळ तालुक्यातील घाटमाथ्यावरील कुची, जाखापूर, कुंडलापूर, गर्जेवाडी, वाघोली, तिसंगी व घाटनांद्रे या पट्ट्यामध्ये अद्याप एकही दमदार पाऊस झालेला नाही. मृग नक्षत्राच्या अखेरीस झालेल्या पावसाच्या किरकोळ सरीवर बळीराजाने मोठ्या धाडसाने पेरण्या केल्या. पण त्यानंतर गेले आठ दिवस झाले, पावसाने पाठ फिरविल्याने बळीराजाच्या चिंतेत वाढ झाली आहे. पेरण्या झालेल्या व उगवून आलेल्या रोपांना आता खरी पावसाची गरज आहे. गेले आठ दिवस पावसाने पाठ फिरवली आहे. कडक ऊन्हामुळे उगवून आलेल्या कोंबांवर परिणाम होत आहे.
रांजणीत शेतकरी हवालदिल
कवठेमहांकाळ तालुक्यातील रांजणी, अग्रण धुळगाव, लोणारवाडी, पिंपळवाडी, अलकूड एस., कोकळे भागातील शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. जूनमध्ये मान्सून सक्रिय झाल्यावर या भागातील शेतकऱ्यांना खरिपाच्या मोठ्या आशा निर्माण झाल्या होत्या. काही शेतकऱ्यांनी बाजरी, तूर, मटकी, मका अशी पेरणी केली. पण मोठ्या पावसाने हुलकावणी दिल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.