दहावीचा जिल्ह्याचा निकाल ९२.४१%
By admin | Published: June 13, 2017 11:42 PM2017-06-13T23:42:54+5:302017-06-13T23:42:54+5:30
दहावीचा जिल्ह्याचा निकाल ९२.४१%
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्चमध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा आॅनलाईन निकाल मंगळवारी जाहीर झाला. जिल्ह्याचा निकाल ९२.४१ टक्के लागला. उत्तीर्णांमध्ये मुलींचे सर्वाधिक ९४.८६ टक्के प्रमाण असून गतवर्षीच्या तुलनेत ते चार टक्के अधिक आहे. बारावीनंतर दहावीमध्येही कडेगाव तालुक्यातील विद्यार्थ्यांनी बाजी मारत सर्वाधिक ९६.४७ टक्के निकालाची नोंद केली, तर सर्वात कमी निकाल जत तालुक्याचा ८९.१६ टक्के इतका लागला. जिल्ह्यातील १४४ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला.
मागील पंधरा दिवसांपासून दहावीच्या निकालाबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. मंगळवारी आॅनलाईन निकाल जाहीर झाल्याने विद्यार्थ्यांसह पालकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. मागील काही वर्षांपासून बारावी आणि दहावीच्या निकालात मुलांपेक्षा मुली आघाडीवर असल्याचे चित्र दिसत आहे.
जिल्ह्यात बारावीच्या निकालानंतर दहावीच्या निकालातही कडेगाव तालुक्याने बाजी मारली. तालुक्याचा सर्वाधिक ९६.४७ टक्के निकाल लागला. जत तालुक्याचा निकाल ८९.१६, आटपाडी ९४.२८, कवठेमहांकाळ ९४.९६, खानापूर ९४.५६, मिरज ९१.३१, पलूस ९४.२६, सांगली शहर ९०.५७, शिराळा ९५.२७, तासगाव ९०.५३ आणि वाळवा तालुक्याचा निकाल ९३.७१ टक्के लागला. जिल्ह्यातील एक हजार ७३८ पुनर्परीक्षार्थींपैकी ५५६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
१४४ शाळांचा शंभर टक्के निकाल
जिल्ह्यातील १४४ शाळांचा दहावीचा निकाल १०० टक्के लागला आहे. यात महापालिका हद्दीतील सर्वाधिक २२ शाळांचा समावेश आहे. आटपाडी तालुक्यातील १२, जतमधील १०, कडेगाव १३, कवठेमहांकाळ ९, खानापूर १६, मिरज १२, पलूस ९, शिराळा १६, तासगाव ६ आणि वाळवा तालुक्यातील १९ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला.
२४ जूनला गुणपत्रिका हाती
विद्यार्थ्यांना २४ जूनला संबंधित विद्यालयामध्ये गुणपत्रिका मिळणार आहे. तसेच १८ जुलैपासून अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा घेतली जाणार असल्याचे माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्यावतीने कळविले आहे. दहावीचा निकाल लागल्याने प्रवेश प्रक्रियेबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. साधारणत: २५ जूनपासून अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरु होणार आहे. निकालाची टक्केवारी वाढली असल्याने प्रवेशासाठी चढाओढ होणार आहे.