जिल्ह्याचा कोरोना पॉझिटिव्हिटी दर ३ टक्क्यांपर्यंत घसरला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:32 AM2021-09-07T04:32:08+5:302021-09-07T04:32:08+5:30
सांगली : कोरोनामुळे हैराण झालेल्या सांगली जिल्ह्यासाठी सध्याचे चित्र दिलासादायक आहे. कोरोनाचा पॉझिटिव्हिटी दर सध्या ३ टक्क्यांपर्यंत घसरला आहे. ...
सांगली : कोरोनामुळे हैराण झालेल्या सांगली जिल्ह्यासाठी सध्याचे चित्र दिलासादायक आहे. कोरोनाचा पॉझिटिव्हिटी दर सध्या ३ टक्क्यांपर्यंत घसरला आहे. उपचाराखालील रुग्णसंख्याही अडीच हजाराच्या घरात असून, त्यातही दिवसेंदिवस घट होत आहे. दुसरीकडे मृत्युदर स्थिर आहे.
जिल्ह्यात एप्रिलमध्ये कोरोना लाट उच्चतम स्तरावर पोहोचली होती. कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट २० टक्क्यांच्या घरात होता. वाढत्या रुग्णसंख्येमुळे कोविड रुग्णालये, सेंटर्स भरले होते. काही दिवस बेड मिळणेही मुश्कील झाले होते. अशा परिस्थितीतून जिल्हा आता बाहेर पडत आहे. लाट सुरू झाल्यानंतर तब्बल सहाव्या महिन्यात ती ओसरत आहे. मागील काही दिवसांपासून जिल्ह्यातील विविध व्यवसायांवरील निर्बंध शिथिल केले आहेत. अशा परिस्थितीत रुग्णसंख्या वाढण्याची भीतीही होती. मात्र, रुग्णसंख्या दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे. त्यामुळे जिल्ह्यासाठी ही दिलासादायक बाब म्हणावी लागेल.
चौकट
तारीख पॉझिटिव्हिटी दर मृत्युदर
२३ एप्रिल १९.४६ ३.०४
२३ मे १७.४८ २.८९
२३ जून ८.५२ २.८४
२३ जुलै ६.२५ २.६५
२३ ऑगस्ट ४.०९ २.६२
६ सप्टेंबर ३.०९ २.६२
चौकट
सणांचा काळ अधिक काळजीचा
सध्या गणेशोत्सवासह दोन महिन्यात मोठे सण येत आहेत. त्यावेळी बाजारपेठांमध्ये गर्दी हाेण्याची शक्यता आहे. या सणांमधील स्थितीबाबत सध्या प्रशासनाला चिंता वाटत आहे. त्यामुळे नागरिकांना त्यांनी दक्षतेचे आवाहन केले आहे. सणांच्या काळात गर्दी झाली तर संसर्ग वाढण्याची शक्यता आहे.
चौकट
लाट ओसरतेय; पण मंदगतीने
पॉझिटिव्हिटी रेट सध्या कमी झाला असला तरी दररोजची रुग्णसंख्या अद्याप ३००च्या घरात आहे. त्यामुळे ही संख्या पन्नासच्याही खाली येण्याची अपेक्षा प्रशासनाला आहे.