जिल्ह्यात पडसाद; बसेस फोडल्या
By admin | Published: January 13, 2015 12:41 AM2015-01-13T00:41:31+5:302015-01-13T00:49:39+5:30
सांगलीत रास्ता रोको : नांद्रे, इनामधामणी, कुमठेत बसेसवर दगडफेक
सांगली : उसाच्या किमान आधारभूत किमतीसाठी (एफआरपी) स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुण्यात केलेले आंदोलन व खासदार राजू शेट्टी यांना अटक केलेल्या कारवाईचे पडसाद आज, सोमवारी शहरात व नांद्रे (ता. मिरज) येथे उमटले. सांगली-इस्लामपूर रस्त्यावरील लक्ष्मी फाट्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने रास्ता रोको केला. नांद्रेत अज्ञातांनी दगडफेक करून दोन एस.टी. बस फोडल्या. या घटनेनंतर शहरासह, नांद्रे, वसगडे, आष्टा, इस्लामपूर व पलूसमध्ये बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.
एफआरपीसाठी स्वाभिमानीतर्फे आज पुण्यातील साखर आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन झाले. आंदोलनास हिंसक वळण लागल्याने कार्यालयावर दगडफेक झाली. याप्रकरणी खासदार शेट्टी यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली. या कारवाईचे वृत्त शहरात येऊन धडकताच संघटनेचे कार्यकर्ते संतप्त बनले. शासनाचा निषेध करण्यासाठी लक्ष्मी फाट्यावर अचानक रास्ता रोको केला. तासभर झालेल्या आंदोलनामुळे वाहतूक ठप्प झाली होती.
यामुळे पोलिसांचीही तारांबळ उडाली होती. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. आंदोलनात संघटनेचे मिरज तालुका युवा आघाडीचे अध्यक्ष विनायक जाधव, बाबासाहेब ठोंबरे, जितेंद्र मिणचे, अण्णासाहेब बेले, राजेंद्र मगदूम, आदी सहभागी झाले होते.
पलूसहून सांगलीकडे येणाऱ्या दोन एस.टी. (एमएच १० बीटी १०६६ व एमएच १२ सीएच ७८६१) बसना अज्ञातांनी लक्ष्य करून नांद्रेत दगडफेक केली. यामुळे चालकांनी एस.टी. थांबविली.
या घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस दाखल झाले. त्यानंतर या मार्गावरून जाणाऱ्या आठ एस.टी. बस नांद्रेतच थांबविण्यात आल्या. रात्री उशिरा या सर्व एस.टी. बस पोलीस बंदोबस्तात सांगलीच्या मुख्य बसस्थानकात आणण्यात आल्या. नांद्रेसह वसगडे (ता. मिरज) येथे पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. दगडफेकीत दोन्ही बसच्या काचा फुटून दहा हजारांचे नुकसान झाले आहे. रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत यांनी नांद्रेत भेट देऊन पाहणी केली. (प्रतिनिधी)
कवठेएकंद येथे ‘क्रांती’चा फलक पेटविला
ऊस आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कवठेएकंद (ता. तासगाव) येथे काही आंदोलकांनी रात्री साडेसातच्या दरम्यान बसस्थानक चौकातील कुंडलच्या क्रांती साखर कारखान्याच्या विभागीय कार्यालयाचा फलक पेटविला. शिवाय रस्त्यावर टायर पेटविल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.