राज्यातील राजकीय अस्थिरतेने जिल्ह्यातील नेत्यांत अस्वस्थता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2019 11:19 AM2019-11-16T11:19:21+5:302019-11-16T11:22:50+5:30
लहरी हवामानाने जिल्ह्याला हैराण केले असतानाच, राज्यातील लहरी राजकारणाचे ढगही आता जिल्ह्यातील राजकारण्यांच्या डोईवर दाटले आहेत. सत्तास्थापनेतील तिढा अद्याप न सुटल्याने येथील सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांमध्ये अस्वस्थता वाढली आहे.
सांगली : लहरी हवामानाने जिल्ह्याला हैराण केले असतानाच, राज्यातील लहरी राजकारणाचे ढगही आता जिल्ह्यातील राजकारण्यांच्या डोईवर दाटले आहेत. सत्तास्थापनेतील तिढा अद्याप न सुटल्याने येथील सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांमध्ये अस्वस्थता वाढली आहे.
विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेला कौल मिळाल्यानंतर युतीचे सरकार येणार म्हणून जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना वेग आला होता. दोन्ही पक्षांचे तीन आमदार मंत्रिपदाच्या शर्यतीत आल्यानंतर त्यांनी मुंबई गाठली होती.
अल्पावधितच राज्यातील राजकीय परिस्थिती कमालीची बिघडली. युतीतील तणाव वाढल्यानंतर जिल्ह्यातील आमदार परतले आणि येथील राजकीय घडामोडींना पूर्णविराम मिळाला. राज्यात सत्तास्थापनेचा तिढा अजूनही सुटलेला नाही. कोणाची सत्ता येणार, हे निश्चित नसल्याने सर्वच पक्षांतील नेत्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.
राज्यातील नवे सरकार कोणाचे व कसे असणार, यावर जिल्ह्यातील राजकीय परिस्थिती बदलणार आहे. माजी मंत्री आ. सुरेश खाडे, माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना त्यांचे मुंबईतील दालन रिकामे करून परतावे लागत आहे. भाजप सत्तेपासून दूर होत असल्याने भाजपचे आमदार, पदाधिकारी व कार्यकर्ते कमालीचे अस्वस्थ झाले आहेत.
गत विधानसभा निवडणुकीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या भाजपची यंदाच्या निवडणुकीत घसरगुंडी झाल्याने आधीच अस्वस्थ असलेल्या भाजपला आता सरकार स्थापन न होण्याची सल आहे. पक्षीय पातळीवर भाजप सध्या शांत असून, बैठका, कार्यक्रम यापासून पक्षाचे नेते, पदाधिकारी दूर आहेत.
कॉँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या संभाव्य आघाडीची चर्चा सुरू आहे. त्यामुळे एकीकडे सत्ता स्थापनेची स्वप्ने आणि दुसरीकडे अस्थिर राजकारणाने वाढत चाललेली धाकधूक, यातून या तिन्ही पक्षांच्या नेत्यांना जावे लागत आहे. सरकार स्थापनेचा तिढा जिल्ह्यातील राजकीय संभ्रमावस्था वाढविणारा ठरत आहे. भाजप व शिवसेनेतील संघर्षाचा परिणाम जिल्ह्यातील अनेक संस्थांवरही होऊ शकतो. राज्यातील सरकार स्थापनेच्या घडामोडींवर जिल्ह्यातील समीकरणे बदलणार आहेत.
मंत्रीपदाच्या शर्यतीतही जिल्हा नेहमीच अग्रेसर राहिला आहे. त्यामुळे प्रत्येक मंत्रिमंडळात जिल्ह्याची दावेदारी भक्कम ठरते. मागीलवेळी जिल्ह्याला सदाभाऊ खोत आणि सुरेश खाडे यांच्या माध्यमातून दोन मंत्रीपदे लाभली होती. त्यापूर्वी आघाडी सरकारच्या काळात जिल्ह्याला नेहमी सर्वाधिक पदे मिळत होती. आता येथील राजकीय परिस्थिती आणि पदांसाठीच्या घडामोडी राज्यातील सत्तास्थापनेनुसार बदलणार आहेत.