शेतकरी संपाबद्दल जिल्ह्यात संभ्रम
By Admin | Published: June 4, 2017 01:16 AM2017-06-04T01:16:38+5:302017-06-04T01:16:38+5:30
संघटनांमध्ये मतभिन्नता : दूध वाहतूक काही प्रमाणात सुरू; आजपासून सर्व संघांकडून पुरवठा होणार
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : मुंबईतील बैठकीत संप मिटल्याचे वृत्त जिल्ह्यात पसरताच आंदोलनकर्त्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला. हे आंदोलन फसल्याचे सांगून शरद जोशीप्रणीत शेतकरी संघटनेने आता संपात सहभागी न होण्याचा निर्णय न घेतला, तर रघुनाथदादा पाटील आणि किसान सभेने संप कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, बंद, पुतळा दहन यासारखी आंदोलने शनिवारी दिवसभर सुरूच राहिली.
आंदोलनकर्त्यांमध्ये शनिवारी दिवसभर संभ्रम दिसत होता. तरीही ठिकठिकाणी संपाची धग कायम राहिली. मिरज तालुक्यातील कसबे डिग्रज, म्हैसाळमध्ये बंद पाळून शासनाचा निषेध करण्यात आला. लेंगरे (ता. खानापूर), येलूर (ता. वाळवा) येथील आठवडा बाजार झाले नाहीत, तर इस्लामपूरमध्ये बळिराजा संघटनेने कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतीकात्मक पुतळ््याचे दहन केले. संपाची तीव्रता थोडी कमी झाल्याचे शनिवारी दिसून आले. काही दूध संघांनी शनिवारी सकाळी दूधपुरवठा सुरू ठेवला, तर बहुतांश खासगी संघांनी रविवारपासून पुरवठा सुरू होण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे शनिवारी भाजी बाजारात थोडी गर्दी दिसत होती.
शेतकरी संघटनांमध्येही आता संपावरून मतभिन्नता दिसत आहे. शरद जोशीप्रणित संघटनेने संपात यापुढे सहभागी न होता, नियोजन करून पुन्हा काही दिवसांनी आंदोलनात उतरणार असल्याचे स्पष्ट केले. दुसरीकडे बळिराजा संघटना, किसान सभा यांनी आंदोलन कायम असल्याचे स्पष्ट केले. गेल्या दोन दिवसांपासून हिंसक बनलेला संप शनिवारी थोडा शांत झाला होता.
पश्चिम महाराष्ट्रात दोनच दिवसात मोठा संप झाला, ही जमेची बाजू आहे. तरीही नेतृत्व नसलेल्या संपात सहभागी होणे ही आमची चूक होती. मागण्यांबाबत चर्चा करण्याचा अनुभव संबंधित पुणतांब्याच्या लोकांना नव्हता. त्यामुळे सरकारने त्यांना फसविले. संपाबाबत आता संभ्रम निर्माण झाला आहे. पुन्हा ते उभारणे शक्य नाही. त्यामुळे थोडे दिवस शांततेने चर्चा करून पुन्हा आंदोलन उभारण्यात येईल.
- संजय कोले, शेतकरी संघटना (शरद जोशीप्रणित)
सरकारने संपकऱ्यांना फसविण्याचे काम केले आहे. एकही मागणी मान्य झालेली नाही. त्यामुळे संप चालू राहील. सोमवारी ५ जूनपासून जिल्"ात तीव्रता वाढविण्यात येईल. मुंबईत झालेल्या बैठकीत कोणताही तोडगा निघालेला नाही. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन चालूच राहील.
- उमेश देशमुख, किसान सभा