Sangli: विधानसभेच्या उमेदवारीवरुन जत तालुका भाजपात अस्वस्थता
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2024 05:58 PM2024-09-11T17:58:31+5:302024-09-11T17:58:57+5:30
विठ्ठल ऐनापुरे जत : भाजपाकडून जत विधानसभेसाठी पाच-सहा उमेदवार इच्छुक आहेत. त्यामुळे उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू आहे. आता उमेदवारी मिळविण्यात ...
विठ्ठल ऐनापुरे
जत : भाजपाकडून जत विधानसभेसाठी पाच-सहा उमेदवार इच्छुक आहेत. त्यामुळे उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू आहे. आता उमेदवारी मिळविण्यात काेण बाजी मारणार, अशा चर्चा रंगत असताना विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर देखील जत मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास तयारीत असल्याने जत तालुक्यातील भाजपात अस्वस्थता निर्माण झाली आहे.
जत विधासभेसाठी भाजपाकडून माजी आमदार विलासराव जगताप, जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे, तम्मनगौडा रवी-पाटील, डॉ. रवींद्र आरळी आदी इच्छुक आहेत. विधानसभेसाठी प्रकाश जमदाडे व तम्मनगौडा रवी यांचे काम जोमात सुरू आहे. दोघेही उमेदवार आपापल्या परीने जनतेच्या कामांसंदर्भात जत तालुक्याचा दौरा करीत आहेत. रवी-पाटील यांनी तीन टप्प्यात जनकल्याण पदयात्रा काढली.
जमदाडेही जिल्हा बँकेच्या माध्यमातून प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी प्रत्येक कार्यक्रमाला हजेरी लावत आहेत. त्यामुळे या दोघांपैकी कोण उमेदवारी पटकावतो, याबाबत उत्सुकता आहे. त्यातच गेल्या काही दिवसांपासून विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनीही जतच्या उमेदवारीसाठी ताकद लावली आहे. यामुळे इच्छुक उमेदवारांसह स्थानिक नेतेमंडळींमध्ये अस्थस्थता आहे.
जत विधानसभेसाठी पडळकरांच्या उमेदवारीस अप्रत्यक्ष विरोध करण्यात येत आहे. जत तालुक्यातील प्रश्नांची जाण असलेला स्थानिक उमेदवारच भाजपने द्यावा, केवळ आमदारकीसाठी लुडबूड करणाऱ्यांना पक्षाचे कार्यकर्ते सहकार्य करणार नाहीत, अशी भूमिका भाजप व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. विधानसभा निवडणूक नजरेसमोर ठेवून गाेपीचंद पडळकर यांनी १ जूनपासून जत तालुक्याचा दौरा केला. दुसरीकडे माजी आमदार विलासराव जगताप यांनीही पडळकर यांच्या उमेदवारीविराेधात आक्रमक भूमिका घेतली आहे. ‘वरून लादलेले नेतृत्व जनता स्वीकारणार नाही, उपरा उमेदवारही जतची स्वाभिमानी जनता सहन करणार नाही’, असा इशारा ते प्रत्येक सभेत देत आहेत.
लाेकसभेला संजय पाटील यांना विरोध करीत जगताप यांनी विशाल पाटील यांचा प्रचार केला. ते निवडूनही आले. आता जत विधानसभा निवडणूक जगताप हे स्वत: लढविणार की जत तालुक्यातील स्थानिक उमेदवारास पाठिंबा देणार?, याबाबतही चर्चेचे फड रंगत आहेत.