महापुराचे पाणी दुष्काळी भागाकडे वळवणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2019 11:59 PM2019-09-16T23:59:53+5:302019-09-16T23:59:58+5:30
सांगली : कृष्णा, वारणा नद्यांच्या महापुराचे पाणी याच जिल्ह्यातील दुष्काळी भागाकडे वळविण्यासाठी शासनाने योजना आखली आहे. याबाबत जागतिक बँकेशी ...
सांगली : कृष्णा, वारणा नद्यांच्या महापुराचे पाणी याच जिल्ह्यातील दुष्काळी भागाकडे वळविण्यासाठी शासनाने योजना आखली आहे. याबाबत जागतिक बँकेशी चर्चा झाल्यानंतर त्यांनी यास तत्त्वत: मान्यता दिली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी सांगलीत महाजनादेश यात्रेवेळी दिली.
सांगलीच्या कर्मवीर भाऊराव पाटील चौकात सोमवारी सायंकाळी फडणवीस यांची सभा झाली. यावेळी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, सामाजिक न्यायमंत्री सुरेश खाडे, खासदार संजयकाका पाटील, आ. सुधीर गाडगीळ, आ. पृथ्वीराज देशमुख, मकरंद देशपांडे, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार, नीता केळकर आदी उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले, महापुरात उद्भवलेली परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ नये, यासाठी आम्ही उपाययोजना करीत आहोत. भविष्यात महापूर आला, तर येथील विद्युत यंत्रणा, पाणीपुरवठा यंत्रणा बंद होणार नाही, यासाठी प्रयत्न केले जातील. जिल्ह्यातील निम्मा भाग महापुराने ग्रासलेला असताना निम्मा भाग दुष्काळाशी सामना करीत होता. जिल्ह्याची ही परिस्थिती बदलण्यासाठी सरकारने नवी योजना आखली आहे. पुराचे अतिरिक्त पाणी सोडण्यासाठी यापुढे धरणातून दुभाजक बोगदा काढण्यात येईल. त्यातून कालव्याद्वारे हे पाणी जिल्ह्याच्या दुष्काळी भागाला देण्यात येईल. जागतिक बँक आणि आशियाई बँकेच्या प्रतिनिधींचे पथक सांगलीला पाठविले होते. त्यांनी पाहणी केली आहे. दुष्काळी भागाला महापुराचे पाणी देण्याबाबतचा प्रस्ताव त्यांच्यासमोर सादर केला असून, त्यांनी त्यास तत्त्वत: मान्यता दिली आहे. याची अंमलबजावणी होण्यास पाच ते सहा वर्षांचा कालावधी लागणार आहे. लोकांचे पुनर्वसन करण्याबरोबरच पुराची तीव्रता कमी करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करू.
महापालिकेच्या इतिहासात सर्वाधिक निधी आम्ही दिला आहे. पूरग्रस्तांना जाहीर केलेली मदत दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही. घरांची पडझड झालेल्या कुटुंबांना, व्यापाऱ्यांनाही आम्ही मदत करीत आहोत, असेही त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांचे ढोलवादन
सांगलीच्या विजयनगर येथे धनगर समाजाच्यावतीने नगरसेविका सविता मदने, अप्सरा वायदंडे यांनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले. समाजाच्यावतीने त्यांना काठी आणि घोंगडे देण्यात आले. यावेळी धनगरी ढोलवादन करण्यात येत होते. मुख्यमंत्र्यांनीही गळ्यात ढोल अडकवून ढोलवादन केले.
महायुतीचेच सरकार येणार
राज्यात भाजप, शिवसेना व अन्य घटक पक्ष एकत्र येणार की नाही, याविषयी मुख्यमंत्री काहीतरी बोलणार, अशी अनेकांना अपेक्षा होती. भाषणाचा समारोप करताना फडणवीस यांनी, राज्यात महायुतीचेच सरकार येणार, असे स्पष्ट केले. भाषणादरम्यान त्यांनी कोठेही शिवसेनेचा उल्लेख केला नाही.