मिरज तालुक्याचे विभाजन बारगळले
By admin | Published: October 21, 2016 01:32 AM2016-10-21T01:32:00+5:302016-10-21T01:32:00+5:30
जिल्हा प्रशासनाची मागणी : सांगलीत अप्पर तहसील कार्यालयाचा प्रस्ताव
सदानंद औंधे ल्ल मिरज
सांगली शहर व पश्चिम भागातील ३० गावांतील ग्रामस्थांना महसुली कामासाठी मिरजेऐवजी सांगलीत अप्पर तहसील कार्यालय निर्मितीचा प्रस्ताव आहे. मिरज तालुक्याचे विभाजन करून स्वतंत्र सांगली तालुक्याच्या मागणीचा प्रस्ताव बारगळल्याने जिल्हा प्रशासनाने अप्पर तहसील कार्यालयाची मागणी केली आहे.
प्रशासकीय सोयीसाठी बहुसंख्य ठिकाणी जिल्ह्याच्याच ठिकाणी तालुका प्रशासन आहे, मात्र सांगली हे जिल्ह्याचे ठिकाण मिरज तालुक्यात आहे. ७२ गावे आणि सुमारे सात लाख लोकसंख्या असलेल्या मिरज तालुक्यात मिरज, सांगली व इस्लामपूर हे असे अडीच विधानसभा मतदारसंघ येतात. नदीकाठचा पश्चिम भाग व कर्नाटक सीमेवरील पूर्व भागापर्यंत मिरज तालुक्याची हद्द आहे. सांगली शहरातील नागरिकांना विविध प्रकारचे दाखले मिळण्याची व्यवस्था जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आली आहे, तर पश्चिम भागातील ३० गावांतील ग्रामस्थांना महसुली कामे व शासकीय, शैक्षणिक कामकाजासाठी आवश्यक असलेले दाखले मिळविण्यासाठी मिरजेला यावे लागते. स्वतंत्र सांगली तालुका झाल्यास पश्चिम भागातील ग्रामस्थांची सोय होऊन व मिरज तहसील कार्यालयावरील ताण कमी होणार आहे. मिरज तालुक्यात आठ मंडल विभागातील सांगली, कसबे डिग्रज, बुधगाव, कवलापूर हे मंडल विभाग सांगली तालुक्यात समाविष्ट करण्याचा प्रस्ताव आहे.
विजयनगर येथे नवीन प्रशासकीय इमारतीत सांगली तालुका कार्यालय सुरू करण्यासाठी प्रशासनाने पाच वर्षांपूर्वी शासनाकडे प्रस्ताव पाठविला होता. मात्र मिरज तालुक्याचे विभाजन करून स्वतंत्र सांगली तालुक्याची निर्मिती करण्यासाठी तहसील कार्यालय, पंचायत समिती व अन्य शासकीय तालुका कार्यालयांसाठी कोट्यवधी रुपये खर्च येणार असल्याने हा प्रस्ताव रखडला आहे.
आ. सुरेश खाडे यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केल्यानंतर तालुका विभाजनाचे निकष निश्चित करण्यासाठी समितीची स्थापना करण्यात आल्याचे उत्तर देण्यात आले होते. मात्र सत्ता बदलानंतरही सांगली तालुक्याच्या प्रस्तावाची शासनाने दखल घेतली नसल्याने स्वतंत्र तालुक्याचा प्रस्ताव बारगळल्याची चिन्हे असल्याने सांगलीसाठी अप्पर तहसील कार्यालयाची मागणी आहे. मात्र या नवीन प्रस्तावाबाबतही निर्णय प्रलंबित असल्याची माहिती मिळाली.
सांगलीसह ३० गावे सोपविणारस्वतंत्र सांगली तालुक्याऐवजी सांगलीत अप्पर तहसील कार्यालय सुरू करण्याच्या जिल्हा प्रशासनाच्या प्रस्तावानुसार मिरज तहसीलदारांकडील कामाचा ताण कमी करून सांगलीसह पश्चिम भागातील ३० गावांतील महसुली कामे सांगली अप्पर तहसीलदारांकडे सोपविण्यात येणार आहेत. हवेली तालुक्यातील पिंपरी, चिंचवड या शहरांंसाठी अप्पर तहसीलदार आहेत.