दिव्यांग मित्र अभियान राज्यात राबविणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2017 11:50 PM2017-08-06T23:50:33+5:302017-08-06T23:50:38+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
कडेगाव : सांगली जिल्हा परिषदेने राबवलेला ‘दिव्यांग मित्र अभियान’ हा उपक्रम राज्यातील पूर्ण जिल्ह्यात राबविणार आहे. संग्रामसिंह देशमुख व अमोल बाबर यांच्या नेतृत्वाखाली विविध शासकीय योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम सांगली जिल्हा परिषद सक्षमपणे करीत असल्याचे प्रतिपादन महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.
कडेगाव येथे आयोजित दिव्यांग मित्र अभियान या कार्यक्रमात दिव्यांग लाभार्थी तपासणीप्रसंगी ते बोलत बोलत होते. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, उपाध्यक्ष सुहास बाबर, महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीचे सदस्य राजाराम गरुड, जिल्हाधिकारी विजय काळम-पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत, जिल्हा पोलीसप्रमुख दत्तात्रय शिंदे, प्रांताधिकारी प्रवीण साळुंखे उपस्थित होते.
यावेळी चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, सांगली जिल्हा परिषदेने राबवलेला दिव्यांग मित्र अभियान हा उपक्रम कौतुकास्पद असून, तो राज्यातील सर्व जिल्ह्यात राबविला जाणार आहे. सरकारबरोबर राज्यातील स्वयंसेवी संघटनेत वाढ करण्यासाठी विशेष प्रयत्न करणार आहे. सर्व शासकीय योजनांचे महत्त्व जाणून त्या घरोघरी पोहोचल्या पाहिजेत, यासाठी लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. लोकप्रतिनिधी हे लोक व शासनातील दुवा आहेत.
संग्रामसिंह देशमुख म्हणाले, दिव्यांग मित्र अभियानात प्रत्येक गावात वाडी वस्तीवर जाऊन नोंदणी केली आहे. जिल्ह्यात ३४ हजार ६५ लोकांची नोंद झाली आहे. यामध्ये २० हजार लोकांकडे प्रमाणपत्रे नाहीत. त्यांची तपासणी करून लवकरच त्यांना प्रमाणपत्र देणार आहे. जिल्हा परिषदेमार्फत सर्व आरोग्य सेवा मोफत दिल्या जात आहेत. यावेळी तहसीलदार अर्चना शेटे, सभापती मंदाताई करांडे, उपसभापती रवींद्र कांबळे, चंद्रसेन देशमुख, धनंजय देशमुख, कडेगाव नगरपंचायतीचे विरोधी पक्षनेते उदयकुमार देशमुख, नथुराम पवार, आरोग्य अधिकारी अशोक वायदंडे, विठ्ठल खाडे, नितीन शिंदे, कृष्णत मोकळे यांच्यासह कार्यकर्ते आदी उपस्थित होते.
जतला सौर ऊर्जा प्रकल्प : देशमुख
सांगली जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींच्या नळ पाणीपुरवठा व प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनांच्या वीजबिल थकबाकीचा प्रश्न कायमचा सोडवण्यासाठी सांगली जिल्हा परिषदेने जत येथे ४० एकर जमिनीवर सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला आहे. आपली जिल्हा परिषद असा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविणारी राज्यातील पहिली जिल्हा परिषद असेल. या सौर ऊर्जा प्रकल्पाच्या उत्पन्नातून सर्व गावांच्या विजबिलाचा प्रश्न सुटणार आहे, असे संग्रामसिंह देशमुख यांनी सांगितले .