उंच पर्वतकडे सर करणाऱ्या दिव्यांग काजलपुढे पैशांच्या अडचणींचा डोंगर, किलीमांजारो मोहिमेची तयारी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2022 01:59 PM2022-12-12T13:59:57+5:302022-12-12T15:36:53+5:30
मोरोशीचा भैरवगड सर करण्याची थक्क करणारी कामगिरी काजलने केली आहे. अशी जोरदार कामगिरी करणारी पहिलीच दिव्यांग महिला ठरली आहे.
सांगली : कळसूबाई शिखरासह अनेक अवघड गिरीशिखरे लीलया पायाखाली घेणाऱ्या काजलला आर्थिक अडचणींच्या डोंगरापुढे मात्र हाराकिरी पत्करावी लागली आहे. यानिमित्ताने समाजाच्या दातृत्वापुढे आव्हान उभे राहिले असून सांगलीकर कन्येच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची वेळ आली आहे.
सांगलीत संजयनगरमध्ये राहणारी काजल दयानंद कांबळे बारा वर्षांपूर्वीच्या एसटी अपघातानंतर ४९ टक्के दिव्यांग बनली. शस्त्रक्रियेनंतर डाव्या पायाची उंची कमी झाली, पण काजलने दिव्यांगत्वालाच आव्हान दिले. गिर्यारोहणासारखा अवघड छंद जोपासला. त्यात यशस्वीही ठरली. राज्यातील सर्वोच्च कळसूबाई शिखर सर केले. वजीर सुळका, भैरवगड व हिरकणी कडा सर करणारी पहिली दिव्यांग महिला ठरली. सध्या आफ्रिकेतील किलीमांजारो सर करण्यासाठी तयारी सुरू आहे. मोहिमेचा खर्चही डोंगराएवढा मोठा आहे, यासाठी दातृत्ववान सांगलीकरांना तिने मदतीचे आवाहन केले आहे.
काजलची कामगिरी
कळसूबाई शिखर, वजीर सुळका, हिरकणी कडा, अंकाई-टंकाई, खांदेरी-उंदेरी, पद्मदुर्ग, रेवदंडा, बिरवडी किल्ला, कोरलाई किल्ला, मुरुड जंजिरा, कुलाबा, बोरीगड, पन्हाळा-पावनखिंड पदभ्रमंती आणि ४०० फूट उंच मोरोशीचा भैरवगड सर करण्याची थक्क करणारी कामगिरी काजलने केली आहे. अशी जोरदार कामगिरी करणारी पहिलीच दिव्यांग महिला ठरली आहे.
किलीमांजारोचे नव्हे, पैशांचेच आव्हान
भविष्यात हिमालयातील शिखरे, तसेच सात खंडांतील सर्वोच्च शिखरे तिला खुणावत आहेत. दक्षिण आफ्रिकेतील १९३४१ फूट उंचीचे सर्वोच्च शिखर किलीमांजारो त्यापैकीच एक असून काजलचे पुढचे पाऊल त्यावर पडणार आहे. प्रजासत्ताक दिनी म्हणजे २६ जानेवारी २०२३ रोजी शिखरावर तिरंगा फडकवायचा आहे. मोहीम दहा दिवसांची आहे. त्यासाठी ६ लाख ७४ हजार रुपये खर्च येणार आहे.